जाणून घ्या : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावर जागतिक शक्तींच्या प्रतिक्रिया !
आपण सर्वांनी मिळून आपल्या लोकांच्या भल्यासाठी काम करूया ! – पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा
नवी देहली – पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले की, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे निवडणुकीतील त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन ! तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशाचा आधार घेत असतांना, मी भारत-अमेरिका संबंध आणि धोरणात्मक भागीदारी आणखी भक्कम करण्याकडे पहात आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या लोकांच्या भल्यासाठी काम करूया आणि जागतिक शांतता, स्थिरता अन् समृद्धी यांना प्रोत्साहन देऊया.
ट्रम्प यांची धोरणे पाहून त्यांना शुभेच्छा देऊ ! – रशिया
रशियाने ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा देण्याचे टाळले. रशियाच्या सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही ट्रम्प यांच्या धोरणांवर आधारित निर्णय घेऊ; कारण अमेरिका ‘मित्र नसलेला देश’ आहे.
दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या.
युरोपने आता स्वतःच्या नशिबाचे दायित्व घ्यायला हवे ! – फ्रान्सची प्रतिक्रिया
‘आम्ही स्वतःला विचारू नये की, अमेरिका काय करेल; परंतु युरोप काय करण्यास सक्षम आहे ? याचा विचार केला पाहिजे. संरक्षण, औद्योगिक अशा अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये युरोपने स्वतःच्या नशिबाचे दायित्व घेतले पाहिजे’, असे फ्रान्स सरकारच्या प्रवक्त्याने ट्रम्प यांच्या विजयानंतर म्हटले आहे.