US Presidential Election Result : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष !

डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – जागतिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. या विजयामुळे ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. डोनाल्ड ट्रम्प यांना २७७ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. त्याच वेळी कमला हॅरिस यांना केवळ २२६ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. ५३८ इलेक्ट्रोरल मतांपैकी २७० मते बहुमतासाठी आवश्यक असतात. ट्रम्प दुसर्‍यांचा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. वर्ष २०१६ मध्ये ते पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते. वर्ष २०२० मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला होता.

मी तुमच्यासाठी प्रतिदिन लढेन ! – ट्रम्प यांचे विजयानंतर जनतेला आश्‍वासन

विजयानंतर समर्थकांसमोरील सभेत ट्रम्प म्हणाले की, आपल्या देशाने याआधी कधीही न पाहिलेला हा ऐतिहासिक राजकीय विजय आहे. हा इतिहासातील सर्वांत मोठा राजकीय क्षण आहे. हा अमेरिकेचा मोठा विजय आहे, ज्यामुळे अमेरिका पुन्हा महान होईल. ४७ वे राष्ट्रपती म्हणून मी तुमच्यासाठी प्रतिदिन लढेन. मी तुमच्या कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी लढणार आहे. आम्ही मतदारांसाठी सर्व काही ठीक करणार आहोत. आपण देशाच्या सीमा अधिक भक्कम करू आणि देशातील सर्व प्रश्‍न सोडवू. पुढील ४ वर्षे अमेरिकेसाठी ‘सुवर्ण युग’ असणार आहे. जनतेने आम्हाला भक्कम जनादेश दिला आहे, असे म्हणत ट्रम्प यांनी जनतेचे आभार मानले.

सभेमध्ये ट्रम्प यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मेलेनिया यांसह मुले आणि अन्य नातेवाईक, तसेच पक्षाचे नेते उपस्थित होते.

उपराष्ट्रपती म्हणून जेडी वान्स यांची नियुक्ती

जेडी वान्स

अमेरिकेचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जेडी वान्स यांनीही त्यांच्या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ट्रम्प यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांना संबोधित करतांना जेडी वान्स म्हणाले की, हे अमेरिकी इतिहासातील सर्वांत मोठे राजकीय पुनरागमन आहे. मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे.



अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा ठरवला जातो ?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक एक अप्रत्यक्ष प्रक्रिया असते. यामध्ये सर्व राज्यांतील नागरिक ‘इलेक्टोरल कॉलेज’च्या ठराविक सदस्यांना मतदान करतात. या सदस्यांना ‘इलेक्टर्स’ म्हणतात. हे इलेक्टर्स नंतर प्रत्यक्ष मते देतात, ज्याला ‘इलेक्टोरल मते’ म्हटले जाते. ते राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यांच्या निवडणुकीत मते देतात. या इलेक्टोरल मतांमध्ये बहुमत मिळवणारे उमेदवार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष  म्हणून निवडले जातात.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मते मिळवणे आवश्यक असते. सध्याच्या निवडणुकीत आतापर्यंत ५०३ निकाल हाती आले आहेत. यात ट्रम्प यांना २७७ इलेक्टोरल मते मिळाली आहेत, तर कमला हॅरिस यांना २२६ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. तसेच ट्रम्प हे विस्कॉसिन, मिशिगन, अ‍ॅरिझोना, नेवाडा आणि अलास्का या राज्यांमध्ये आघाडीवर असल्याने ते ३०० हून अधिक मते मिळवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


संपादकीय भूमिका

  • अमेरिकेतील नागरिकांनी ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावर बसवून स्वतःच्या देशाचा विचार केल्याचेच यातून दिसून येत आहे. ट्रम्प अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांप्रमाणे  अन्य देशांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत, हीच अपेक्षा आहे !
  • ट्रम्प मोदी यांना मित्र मानतात आणि त्यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या संदर्भातही निवडणुकीत काही दिवसांपूर्वी विधान केले. ते पहाता ट्रम्प यांनी प्रत्यक्ष भारताला साहाय्य ठरणारी आणि हिंदूंच्या रक्षणासाठी कृती करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !