Delhi HC On Chhath Puja : प्रदूषित यमुना नदीच्या काठावर छठपूजा करण्याची अनुमती देता येणार नाही !

देहलीच्या आप सरकारने प्रदूषणामुळे पूजा करण्यावर घातली आहे बंदी !

(उत्तर भारतात कार्तिक महिन्यात शुक्ल षष्ठीपासून पुढे ४ दिवस सूर्यदेवतेच्या नावाने ‘छठपूजा’ केली जाते.)

प्रदूषित यमुना नदीत देहली उच्च न्यायालयाने छठपूजेची अनुमती नाकारली !

नवी देहली – यमुना नदीच्या काठावर छठपूजेला अनुमती मागणार्‍या याचिकेवर विचार करण्यास देहली उच्च न्यायालयाने नकार दिला. देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने नदीच्या प्रदूषणामुळे यमुनेच्या काठावर छठपूजेवर बंदी घातली आहे. पूर्वांचल नवनिर्माण संस्थेने या विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती.

देहली उच्च न्यायालयाने सांगितले की, छठपूजेला प्रारंभ होत आहे. आम्ही शेवटच्या क्षणी कोणताही आदेश देऊ शकत नाही. यमुना एका रात्रीत स्वच्छ करता येत नाही. यमुनेचे पाणी इतके घाणेरडे आहे की, लोकांनी त्यात प्रवेश करून पूजा केली, तर ते स्वतःच आजारी पडतील. त्यामुळे आम्ही पूजेची अनुमती देऊ शकत नाही.

संपादकीय भूमिका

देशातील बहुतेक नद्या प्रदूषित झाल्या आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद आहे. हिंदु धर्मानुसार नद्यांना आध्यात्मिक महत्त्व असल्याने आता या नद्यांच्या शुद्धतेसह पावित्र्यही प्रदूषणामुळे नष्ट करण्यात आले आहे. हे हिंदूंनाही तितकेच लज्जास्पद आहे !