‘एकल गीत’ रामायणात रोहित जोशी यांचे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव !
कोल्हापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – भाऊबीज, ३ नोव्हेंबर या दिवशी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या एकल गीत रामायण या सोहळ्यात श्री. रोहित जोशी यांनी एकाच दिवसात गीत रामायणातील ५६ गाणी गाऊन ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवले. सकाळी ९.१५ वाजता ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ म्हणून श्री. रोहित जोशी यांनी ‘कुश-लव रामायण गाती’ या गाण्याने प्रारंभ केला. सायंकाळी ५.३० वाजता सर्व ५६ गाणी सादर केल्यानंतर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’च्या परीक्षक डॉ. प्रियांका आवाळे यांनी श्री. रोहित जोशी यांना पदक बहाल करून प्रशस्तीपत्रक दिले.
या गीतरामायणाचे निवेदन श्री. सुधीर जोशी यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. श्रीकांत लिमये यांनी केले. या गायनात श्री. रोहित जोशी यांना ‘स्वरब्रह्म’चे श्री. निखिल जोशी, श्री. प्रफुल्ल शिंदे, सौ. राधिका ठाणेकर, सौ. मिताली जोशी, सौ. राधा जोशी यांसह अन्य कलाकारांना साथ दिली. चिपडे ज्वेलर्सचे श्री. मुरलीधर चिपडे, कोल्हापूर चित्पावन संघाचे अध्यक्ष श्री. मकरंद करंदीकर, उपाध्यक्ष श्री. प्रसाद भिडे, पंचगंगा बँकेचे उपाध्यक्ष श्री. रामचंद्र टोपकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.