मुले, काम, तारांबळ आणि उपाययोजना
‘दोन मुले हे आजच्या युगातील स्त्रीच्या शरीर आरोग्यावर बराच परिणाम करणारे आहे यात काही वाद नाही. एकाचे दोन होतात, तेव्हा ५ कामांची ५०० कामे होतात; कारण त्यामध्ये मुलांचा स्वभाव, त्यांच्या परस्पर क्रिया यांची भर पडते. यात आई होतांना स्त्रीचे वाढलेले वय आणि सध्याच्या आहाराची ढासळलेली सकसता ही कारणेही आहेत. पहिले मूल वाढवतांना दुसरे पोटात वाढवायचे; पहिल्याचे हट्ट, मागण्या, शाळा हे सांभाळून दुसरे बाळ, स्वतःचे काम, संगोपन आणि स्वतःचे आजार हे कार्य सोपे अजिबातच नाही. दोन मुलांची आई आणि वैद्य या नात्याने काही गोष्टी मला जाणवल्या ते येथे देत आहे.
१. पहिले आणि महत्त्वाचे, म्हणजे २ मुलांच्या नादात तुमच्या मानसिक प्रकृतीकडे दुर्लक्ष व्हायला नको. वाटल्यास घरातील किंवा बाहेरचे साहाय्य घेऊन अर्धा घंटा स्वतःसाठी ठेवा. त्यात अगदी साधे गाणे ऐकणे, चालायला जाणे, एखादा लेख वाचणे, चित्र रंगवणे किंवा चहाचा आस्वाद असे काहीही असेल. या आनंदाने तुम्हाला मूल सांभाळायला परत हुरूप येईल.
२. शरीर प्रकृतीसाठी इथे कितीही नियम सांगितले, तरी २ मुलांचे वेळापत्रक सांभाळतांना, दुसरे मूल किमान ३ वर्षांचे होईपर्यंत स्वतःचे वेळापत्रक पूर्ण बसवणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे जसा वेळ होईल, किमान जागच्या जागी ‘स्ट्रेचेस’ करणे (शरीर ताणून मोकळे करणे), स्वयंपाकघरात भांडी मुद्दाम नीट कंबरेत वाकून काढणे, भाजी शिजत असतांना हात मागे नेणे, त्यांना ताण देणे, हे करावे.
३. २-२ वेळा स्तनपान करून पुढे वाकून बसल्याने आणि स्वतःचे सध्या तसे काही सर्वांगीण शारीरिक काम नसण्याने शरिराची ठेवण बिघडते. त्यासाठी खांद्याचे मागे ताणले जाणारे व्यायाम, तसेच कंबरेचे व्यायाम सल्ला घेऊन लवकरात लवकर चालू करावेत, नाही तर पाठीला एक विशिष्ट पोक येतो, जो घालवणे थोडे अवघड असते.
४. दुसरे मूल लहान असतांना तुम्हाला पहिल्या मुलाला मुद्दाम वेळ द्यायला लागतो. त्यात तुम्ही तुम्हाला त्याला द्यायला सोपे, त्याला आवडणारे आणि फार पसारा न करणारे खेळ आणू शकता. धाकटे मूल तो खेळ तोंडात घालून गिळणार नाही, याची विशेष काळजी घ्या. यामध्ये लाकडी मोठे ब्लॉक, प्लास्टिक कव्हर कार्डबोर्ड पुस्तके देऊ शकता. आंबा, पिंपळ यांची पाने आणून ती चिकटवता येतील. कधीतरी नुसते कोरडे पोहे आणि २ पातेली दिली, तरी ते खेळण्यात बराच वेळ जातो. कांदे, बटाटे, वाट्या, कढई ही खेळणी घरातल्या घरात आणि सोपी पडतात. बागेतील काटक्या रंगवता येतात. यामध्ये घरातील लोकांचे साहाय्य घेता येईल.
५. संध्याकाळी मुलांच्या पायाला तेल लावतांना स्वतःच्या पायालाही थोडे तेल लावावे. यामुळे तुमचे श्रम न्यून व्हायला नक्कीच साहाय्य होते.
६. दोन मुलांचे सगळे सांभाळतांना स्वतःसाठी पाणी कमी प्यायले जात नाही ना ?, याकडे आवर्जून लक्ष द्या. कामामुळे पुष्कळ तणावात असला, तर २ घोट पाणी प्या. त्यामुळे पटकन बरे वाटते. ‘पाणी हे आश्वासन देणारे आहे’, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
७. पुष्कळ आवाज करणारी बॅटरीवर चालणारी खेळणी शक्यतो टाळा. शहरात आजूबाजूला एवढे आवाज असतांना त्यात ती
खेळणी घरात अजून आवाज वाढवतात. सौम्य आवाजाची किंवा बटण दाबले की, आवाज येणारी पुस्तके मिळतात, ती आणता येतील. अशी पुस्तके ६ मास ते ५ वर्षांपर्यंतच्या सगळ्या मुलांना आवडतात आणि आपल्यालाही आवाजाचा फार त्रास होत नाही.
८. २ मुले असतील, तर दुसरे मूल ३-४ वर्षांचे होईपर्यंत पुष्कळ छोटे छोटे सुटे भाग असणारी खेळणी शक्यतो टाळावीत. मोठ्या मुलासाठी आणलेले पुष्कळ छोटे खेळ व्यवस्थित ठेवण्यात स्वतःची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा व्यय होते, तसेच लहान मुलांकडून तोंडात घालण्याचा धोका असतो. नळ्यांचे खेळ, सोंगट्यांचा खेळ, ‘ब्लॉक’ (ठोकळे), पुस्तके, कोडे हे खेळ दोघांनाही खेळता येतात.
९. दुसरे मूल १० मासांचे झाल्यावर पराठा (मेथी, पालक, गाजर, कोथिंबीर, बटाटा यांचा), मखाणा, दूध-साखर-पोळी, तूप-मेतकूट-भात, कटलेट, धिरडी, फळांचे तुकडे, असे पौष्टिक पदार्थ करता येतील, ज्यामुळे आपला वेळ वाचतो.
१०. ‘मुलांना आवडेल तेच बनवायचे’, यापेक्षा ‘जे पदार्थ बनवले ते मुले खातील’, अशी सवय करायचा प्रयत्न करावा. अशा वेळी मोठे मूल कदाचित् थोडा त्रास देऊ शकते. थोडे दुर्लक्ष आणि मनावर दगड ठेवून एखाद वेळी ‘नाही खाल्ले तरी चालेल’, असे केले असता ‘जे बनले आहे ते खायचे’, अशी सवय मुलांना होते. मिरची किंवा तिखट यांचा मात्र आग्रह नको. जेव्हा त्यांना सोसेल आणि ते खातील, तेव्हा खाऊ दे.
११. मुलांना लहानपणापासून स्वतःची ताटली भांडी धुण्याच्या पात्रात (सिंकमध्ये) नेऊन ठेवणे, शौचालयाला जाऊन आले की, दिवा बंद करणे; स्वतःचे कपडे धुलाई यंत्रामध्ये ठेवणे, चप्पल जागेवर ठेवणे, त्यांच्या उंचीला येणार्या वस्तू पुसणे या सवयी लावायचा प्रयत्न आवर्जून करा. मुले जितकी लवकर स्वावलंबी बनतील, तेवढा तुमच्यावरचा ताण न्यून होईल.
१२. दुसरे मूल १ वर्षाचे झाले की, स्वतःसाठी वार्षिक बस्ती उपक्रम आणि नियमित व्यायाम हे स्वतःचे वजन, पाठ अन् पोट (पचन) नीट ठेवायला साहाय्य करील. याविषयी जवळच्या शुद्ध आयुर्वेद चिकित्सकांना विचारू शकता.
१३. घरचे किंवा बाहेरचे साहाय्य घेणे यात वाईट काही नाही. दोन्ही पालकांच्या स्वास्थ्यासाठी आवश्यकतेनुसार हा विचार नक्की करावा.
१४. एखादा दिवस असाही येतो की, सगळे चुकत चुकत जाते, त्यातही मुले लहान असतील आणि साहाय्य नसेल, तर अधिकच त्रास होतो. मूल आजारी, महत्त्वाचे काम आणि मोठ्या मुलाच्या शाळेत पालकसभा हे एकाच दिवशी आले, तर आपल्या दिवसाचे सगळे नियोजन बिघडू शकते. अशा वेळी फक्त एक दीर्घ श्वास घ्या आणि ‘This too shall pass’ (यातूनही उत्तीर्ण होऊ), हे लक्षात ठेवा, त्याने मार्ग दिसतील.’
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.