दौंड (पुणे) येथे गोरक्षकांनी केलेल्या कारवाईत १६ बैलांची सुटका !

प्रतिकात्मक चित्र

दौंड (जिल्हा पुणे) – अहिल्यानगर येथून दौंडकडे ट्रकमध्ये बैल घेऊन जात असल्याची माहिती ५ नोव्हेंबर या दिवशी गोरक्षक अक्षय कांचन यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी श्री. उमेश गव्हाणे यांना भ्रमणभाष करून ती गाडी अडवायला सांगितली. श्री. उमेश गव्हाणे यांनी सदर गाडी थांबवून पहाणी केली असता गाडीमध्ये १६ बैल कत्तल करण्याच्या उद्देशाने दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे दिसून आले. नियमानुसार केवळ ६ गोवंशियांची वाहतूक करू शकतो. त्या वेळी त्या ठिकाणी त्यांनी पोलीस बोलावले. तेथे दौंड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड आले आणि त्यानी उमेश यांची चौकशी करून ‘तू गोरक्षक नाहीस’, असे म्हणून त्यांना जाण्यास सांगितले आणि ती गाडी काही वेळाने सोडून दिली.

या घटनेची माहिती श्री. उमेश यांनी गोरक्षक अक्षय कांचन यांना कळवली. त्यानंतर अक्षय कांचन यांनी राठोड यांना संपर्क करून, ‘ती गाडी बैलांची हत्या करण्यासाठी चालली आहे, मी तिकडे येत आहे’, असे सांगितल्यावर राठोड यांनी परत ती गाडी जाऊन पकडली. १ लाख ५० सहस्र रुपये मूल्याचे १६ बैल कह्यात घेतले. त्या वेळी आसिफ शेख आणि लक्ष्मण जगताप हे त्या गाडीमध्ये होते. त्यांनी ‘ही जनावरे ऊस वाहतुकीसाठी घेऊन चाललो आहे’, असे सांगितले; मात्र प्रत्यक्षात ही जनावरे हत्या करण्याच्या उद्देशाने घेऊन जात होते. या प्रकरणी संकल्प पाटोळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड यांनी याआधीही कसायांशी संगनमत करून त्यांच्याकडून पैसे घेऊन कित्येक गाड्या सोडल्या आहेत, असे गोरक्षकांचे म्हणणे आहे. (पोलीस विभागात असे पोलीस असणे, हा पोलीस विभागाला कलंकच आहे. या पोलिसांना कुणाचा पाठिंबा आहे, हेही शोधायला हवे ? अशा पोलिसांमुळे गोमातेसह तिचे रक्षण करणारे गोरक्षक संकटात, तर गोहत्या करणारे कसाई मोकाट आहेत. अशा पोलिसांना कठोर शिक्षा द्यायला हवी, असेच जनतेला वाटते. – संपादक)

संपादकीय भूमिका :

गोवंश हत्याबंदी कायद्याचा काही उपयोग आहे कि नाही ?