कुटुंबियांना साधनेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना तळमळीने साधनेस प्रवृत्त करणारे बांदोडा (गोवा) येथील श्री. दीपक छत्रे !
श्री. दीपक छत्रे (वय ५६ वर्षे) यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना नेहमी साधनेसाठी प्रोत्साहन दिले. त्यांनीच साधनेचे महत्त्व त्यांच्या कुटुंबियांच्या मनावर बिंबवले. त्यांच्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. आरती दीपक छत्रे (श्री. दीपक छत्रे यांच्या पत्नी), बांदोडा, फोंडा, गोवा.
१. लग्नानंतर यजमानांनी साधनेचे प्रयत्न करायला सांगणे : ‘आमचे लग्न ठरले. तेव्हापासून माझे यजमान (श्री. दीपक छत्रे) मला साधनेविषयी सांगायचे. त्यांनी मला कुलदेवीचा नामजप करायला सांगितला. लग्नानंतर ते मला साधनेचे प्रयत्न करायला सांगायचे. त्यांनीच मला मानसपूजा करायला शिकवली. लग्नानंतर ते सत्सेवेसाठी मला सनातनच्या आश्रमांत न्यायचे. लग्न होऊन मुले झाल्यानंतर माझे आश्रमात जाऊन सेवा करणे उणावले होते.
२. मानसिक त्रास होत असतांना यजमानांनी धीर देऊन सर्व ईश्वरावर सोडून देण्यास सांगणे : मधल्या काळात जवळच्या नातेवाइकांकडून आम्हाला पुष्कळ मानसिक कष्ट झाले. त्यामुळे मी अत्यंत तणावात असायचे. तेव्हा माझ्या यजमानांनी मला धीर देऊन ‘‘सर्व काही ईश्वरावर सोडून दे. तो आपली सर्व काळजी घेत आहे’’, असे सांगितले.
३. प्रत्येक कृती करतांना भाव ठेवणे आणि प्रार्थना करण्यासाठी सांगणे : ते नेहमी ‘आज आमच्याकडे जे काही आहे, ते ईश्वराचेच आहे’, असा भाव ठेवायचा प्रयत्न करतात. ते सतत आम्हाला प्रत्येक कृती करतांना भाव ठेवणे आणि प्रार्थना करणे यांसाठी आठवण करून देत असतात.
४. कृतज्ञताभावात असणे : ‘आम्ही सर्वजण सेवा आणि साधना करत आहोत’, याविषयी ते नेहमी ईश्वरचरणी कृतज्ञ असतात.
५. कुटुंबियांमुळे आश्रमात पुन्हा सेवेसाठी जाता येणे : गुरुदेवांच्या कृपेने मला या वर्षीपासून पुन्हा सेवेसाठी आश्रमात जाता येत आहे. ही सेवा करण्यासाठी माझे यजमान आणि माझ्या मुली यांनी मला प्रोत्साहन दिल्याने मी ही सेवा करू शकत आहे.’
कु. अवनी दीपक छत्रे (श्री. दीपक छत्रे यांची थोरली मुलगी)
१. जन्माला आल्यावर दोन्ही मुलींना गुरुचरणी अर्पण करणे आणि पुढे त्याच दृष्टीने संगोपन करणे : ‘आम्ही दोघी बहिणी जन्माला आल्यावर मनोमन आम्हाला गुरुचरणी अर्पण केल्याचे आमचे वडील नेहमी सांगतात. आम्हीही त्यांचा आमच्याशी तसाच व्यवहार असल्याचे अनुभवले आहे. त्यांनी आमच्या मनावर अधिकाधिक गुरुचरणांचे स्मरण बिंबवले आहे. ज्यामुळे आता आम्हाला साधना करण्याची इच्छा निर्माण झाली आणि श्री गुरूंवरची श्रद्धा दृढ झाली.
२. भजने, स्तोत्रे, नामजप, आरती इत्यादी ऐकवून दोघी बहिणींवर भावभक्तीचे संस्कार करणे : अगदी आमच्या जन्मापासूनच वडिलांनी आम्हाला भजने, स्तोत्रे इत्यादींची गोडी लावली. ते भजने लावून ठेवत अथवा स्वतः म्हणून दाखवत. यामुळे आम्हा दोघी बहिणींवर भावभक्तीचे संस्कार झाले आहेत.
३. ‘साधना हे कृतीचे शास्त्र आहे आणि ते दैनंदिन जीवनात अनुभवले पाहिजे’, हे मनावर बिंबवणे : आम्ही अभ्यास करणे, वैयक्तिक कृती करणे किंवा टीव्ही वर संत-देवता यांच्याविषयीचे कार्यक्रम पहाणे इत्यादी कृती करत असतांना ते नेहमी सांगत, ‘प्रत्येक कृती भावपूर्ण झाली पाहिजे. तिच्यातून शिकता आले पाहिजे; कारण साधना हे कृतीचे शास्त्र आहे. ते दैनंदिन जीवनात अनुभवले पाहिजे.’ यासाठी त्यांनी आम्हाला भाव जागृत करण्यासाठीचे विविध प्रयोग सुद्धा शिकवले.
४. मनातील शंकांचे निरसन केल्यामुळे मनात राष्ट्र आणि धर्म यांविषयी दृढ अभिमान निर्माण होणे : लहानपणी प्रत्येक गोष्टीविषयी आम्हाला जिज्ञासा असायची. आमचे वडील त्या प्रश्नांना समर्पक उत्तरे द्यायचे. त्यांनी कधीच आम्हाला प्रश्न विचारण्यापासून रोखले नाही. यामुळे आमच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांविषयी दृढ अभिमान निर्माण झाला.
५. समाजातील अयोग्य सूत्रांविषयी सतर्क केल्यामुळे तत्त्वनिष्ठता विकसित होणे : आम्ही शाळेत, शिकवणीला किंवा त्यानंतर महाविद्यालयात जायचो. तेव्हा ते आम्हाला समाजातील राजकारण, तथाकथित इतिहास, साधनेपासून भरकटवणारी नास्तिक आणि सर्वधर्मसमभावी वृत्ती इत्यादी अनेक अयोग्य सूत्रांविषयी समजवायचे. ते त्याविषयी ‘योग्य-अयोग्य काय आहे ?’, ते सांगून आम्हाला सतर्क रहाण्यास सांगत असत. यामुळे आमच्यातील तत्त्वनिष्ठता विकसित झाली.
६. वडिलांनी कुसंस्कारांपासून पुष्कळ दूर ठेवल्यामुळे विचारसरणी साधकत्वाकडे वळण्यास गती मिळणे : आम्ही दोघी लहान असतांना इतर मुले दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहातात तसे ‘‘आम्हालाही कार्यक्रम पहायचे आहेत’’, असे आम्ही म्हणायचो; परंतु आमच्या वडिलांनी आम्हाला चित्रपटातील एकही गाणे ऐकू दिले नाही. याचे महत्त्व आता लक्षात येते. वडिलांनी आम्हाला कुसंस्कारांपासून पुष्कळ दूर ठेवले. त्यामुळे आमची विचारसरणी साधकत्वाकडे वळण्यास गती मिळाली.
७. लहानपणापासून अध्यात्माची गोडी लावल्याने श्री गुरूंविषयीचा भाव दृढ होणे : आम्ही लहान असतांना वडील आम्हाला संतचरित्र, तसेच देवतांविषयीचे ग्रंथ वाचायला आणून देत असत. त्यांनी आम्हाला तेव्हापासून अध्यात्माची गोडी लावली. यामुळे आमचा श्री गुरूंविषयीचा भाव दृढ झाला, तसेच साधना समजणे सोपे झाले.
८. मुलींची साधना व्हावी, यासाठी संत आणि साधक यांच्या सत्संगात ठेवण्याचा प्रयत्न करणे : आमचे वडील नेहमी साधक आणि संत यांना घरी आमंत्रित करायचे किंवा आम्हाला साधकांच्या घरी, तसेच आश्रमात घेऊन जायचे. त्यामुळे आम्हाला त्यांचा सत्संग लाभायचा. लहानपणापासून आम्हाला श्री गुरूंची ओळख अशी होत गेली आणि तिचे भावात रूपांतर झाले. त्यामुळे त्यांची आमच्या साधनेबद्दलची तळमळ लक्षात येते.
९. पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणे : मी पूर्णवेळ साधना करायचे ठरवले. तेव्हा अनेक नातेवाइक आणि ओळखीचे यांनी मला विरोध केला; परंतु वडिलांनी मला संपूर्ण पाठिंबा दिला. अजूनही ते मला साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करतात.
१०. अहं वाढू नये, याची काळजी घेणे : आमचे वडील आम्हाला नेहमी सर्वांसमोर प्रतिमा न जपता चुका सांगायचे. त्यामुळे आम्हाला ‘चुका कशा स्वीकारायच्या ? आणि त्यातून कसे शिकायचे ?’, हे लक्षात आले. त्यामुळे आम्हाला आता स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करणे सोपे पडते.
आमच्या वडिलांकडून आम्हाला हे सर्व गुण आणि सूत्रे शिकायला मिळाली, यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते, तसेच ‘गुरूंना अपेक्षित अशी साधना आम्हा कुटुंबियांकडून होऊ दे’, ही गुरुचरणी प्रार्थना करते.’
कु. सुरभी दीपक छत्रे (श्री. दीपक छत्रे यांची धाकटी मुलगी), बांदोडा, फोंडा, गोवा.
१. लहानपणापासून मुलींना साधनेकडे वळवणे : ‘मी आणि माझी मोठी बहीण (कु. अवनी) लहान असल्यापासून साधनेत यावे’, अशी आमच्या बाबांची इच्छा होती. त्यांनी आजपर्यंत आम्हाला कधीही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी सांगितले नाही किंवा आमच्यावर कधी अभ्यासाचा दबाव आणला नाही. ते नेहमी म्हणायचे ‘‘तुम्ही अभ्यासात पुढे गेला नाहीत, तरी चालेल; पण तुम्ही साधना चांगली करा.’’ त्यासाठी ते आमच्याकडून मानसपूजा, शाळेत जातांना प्रार्थना, कधी कधी नामजप इत्यादी साधनेचे प्रयत्न करवून घ्यायचे.
२. कुठल्याही प्रकारच्या यशाचे श्रेय गुरुचरणी अर्पण करायला सांगणे : कधीही कुठल्याही प्रकारचे यश मिळाले की, ते आधी गुरुचरणी अर्पण करायला सांगायचे. लहान असतांना हे सर्व करायला कंटाळा यायचा; पण आता साधनेत आल्यावर मला या सर्वांचे महत्त्व लक्षात येत आहे.
३. सेवा आणि साधना यांविषयी प्रोत्साहन देणे : मी सत्सेवा करू लागल्यापासून त्यांनी मला सेवेविषयी कुठल्याही प्रकारचे बंधन घातले नाही. रात्री उशिरापर्यंत सेवा असली, तर ते स्वतः मला सोडायला आणि न्यायला येतात. ते नेहमीच आम्हा दोघींना सेवा आणि साधना यांविषयी प्रोत्साहन देत आले आहेत.’
(सर्व सूत्रांचा दिनांक – २५.७.२०२४) (क्रमश:)