पुणे विमानतळावरील विविध विमानांमध्ये बाँब ठेवल्याची अफवा !
पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘इंडिगो एअरलाइन्स’ आस्थापनातील विमानामध्ये बाँब ठेवल्याचा संदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाँबशोधक पथकाने घटनास्थळी जाऊन पडताळणी केली. तेव्हा बाँबसदृश वस्तू आढळून आली नाही. अफवा पसरवल्याच्या प्रकरणी विमानतळ पोलिसांकडून सामाजिक माध्यमांमधील संबंधिताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘इंडिगो एअरलाइन्स’ या आस्थापनातील विविध विमानांमध्ये बाँब ठेवण्यात आला आहे, असा संदेश ‘ॲडमलान्झा ९७५१४’ या नावाने सामाजिक माध्यमांतून करण्यात आला होता. संदेशानंतर विमानाची पडताळणी करण्यात आली. त्यामुळे विमानप्रवाशांना काही घंटे विमानतळावर थांबावे लागले. गेल्या काही दिवसांपासून विमानामध्ये बाँब ठेवण्यात आल्याचे संदेश सामाजिक माध्यमांतून पाठवण्यात येत आहेत. या संदेशामुळे विमान आस्थापने आणि प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
संपादकीय भूमिका :बाँब ठेवल्याची अफवा पसरवणार्यांना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत ! |