६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व शासकीय सवलती लागू कराव्यात ! – देवेंद्र भुजबळ, माजी राज्य माहिती संचालक

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – महाराष्ट्र राज्यात सध्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लागू असणार्‍या शासनाच्या सर्व सवलती ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लागू करण्यात याव्यात, अशी मागणी माजी राज्य माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी सानपाडा येथे एका कार्यक्रमात केली. ‘महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघा’च्या अध्यक्षपदी अण्णासाहेब टेकाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

अण्णासाहेब टेकाळे यांनी भुजबळ यांनी केलेल्या सूचनेचा संदर्भ देऊन सांगितले की, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लागू असणार्‍या शासनाच्या सर्व सवलती ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लागू करण्यात याव्यात, अशी मागणी सरकारकडे लवकरच करण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून दरमहा मिळणारे १ सहस्र ५०० रुपयांचे निवृत्ती वेतन ३ सहस्र रुपये करण्यात यावी, अशीही मागणी सरकारकडे करण्यात येईल. महाराष्ट्रात सध्या १ कोटी ४० लाख ज्यष्ठ नागरिक असून त्यापैकी ५३ टक्के महिला, तर ४७ टक्के पुरुष आहेत. सर्व ग्रामपंचायती आणि महानगरपालिका यांनी शासनाच्या धोरणानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे उभारावीत. राज्यात सर्वांत जास्त म्हणजे ३२ विरंगुळा केंद्रे नवी मुंबईत आहेत.

प्रारंभी सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कदम यांनी संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सानपाडा संघाच्या ११ सदस्यांना पुरस्कार मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी केले, तर प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन सचिव शरद पाटील यांनी केले. या वेळी सानपाडा नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.