दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : डॉ. हीना गावित यांचे भाजपचे त्यागपत्र !; उद्धव ठाकरे यांनी मराठीद्वेष्ट्या काँग्रेसविषयी भूमिका स्पष्ट करावी !…
डॉ. हीना गावित यांचे भाजपचे त्यागपत्र !
नंदुरबार – माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचे आणि पक्षातील सर्व पदांचे त्यागपत्र पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहे. त्या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेचा उमेदवारी अर्ज (अपक्ष) भरला आहे. अपेक्षित मतदारसंघ न दिल्याने गावित यांनी हा निर्णय घेतला.
उद्धव ठाकरे यांनी मराठीद्वेष्ट्या काँग्रेसविषयी भूमिका स्पष्ट करावी !
आशिष शेलार यांचे आव्हान
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसने मुंबईत दिलेल्या ११ उमेदवारांपैकी २ उमेदवार मराठी आहेत. इतका पराकोटीचा मराठीद्वेष दाखवणार्या काँग्रेसविषयीची आपली भूमिका स्पष्ट करा, असे आव्हान मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या (ठाकरे गटाच्या) उद्धव ठाकरे यांना दिले. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत हाेते.
मविआविरोधात भाजप प्रतिदिन आरोपपपत्र प्रविष्ट करणार !
ठाणे – महाराष्ट्रद्रोही, विकासद्रोही, शेतकरीविरोधी, महिला आणि युवकविरोधी महाविकास आघाडीच्या विरोधात प्रदेश भाजपकडून प्रतिदिन आरोपपपत्र प्रविष्ट करण्यात येणार आहे, असे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यात ६ लाख ४१ सहस्र ४२५ दिव्यांग मतदार !
मुंबई – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी एकूण ६ लाख ४१ सहस्र ४२५ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ३ लाख ८४ सहस्र ६९ पुरुष मतदार, २ लाख ५७ हजार ३१७ महिला दिव्यांग मतदार, तसेच ३९ तृतीयपंथी दिव्यांग मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. राज्यात तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची एकूण संख्या ३९ आहे. सर्वाधिक तृतीयपंथी दिव्यांग मतदार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत.
ठाणे येथे ९० उमेदवारांची निवडणुकीतून माघार !
ठाणे – येथे उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी ३३४ उमेदवारांपैकी ९० उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे जिल्ह्यात सध्या २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याचप्रमाणे इच्छुक असलेल्या ४७ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.