पू. अशोक पात्रीकर यांच्या सत्संगात साधिका करत असलेल्या नामजपात पालट होऊन तिचा ‘परम पूज्य’, असा नामजप आपोआप होऊ लागणे आणि आनंदाची अनुभूती येणे
‘२३.५.२०२४ या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकरकाका (वय ७४ वर्षे), मी आणि चालक-साधक एका जिज्ञासूला भेटण्यासाठी जात होतो. पू. काका गाडीच्या पुढील आसनावर बसले होते. त्या वेळी मी ‘ॐ ॐ श्री दुर्गादेव्यै नमः ॐ ॐ ।’, हा नामजप करत होते. थोड्या वेळाने गाडीच्या पुढील खिडकीतून ऊन आत येऊ लागले. तेव्हा मी पू. काकांना म्हणाले, ‘‘पू. काका, ऊन पुष्कळ आहे. तुम्ही मागे येऊन बसता का ?’’ त्याप्रमाणे पू. काका मागील आसनावर माझ्या शेजारी येऊन बसले.
पू. काका शेजारी येऊन बसल्यावर माझ्या नामजपात आपोआप पालट होऊन माझा ‘परम पूज्य, परम पूज्य’, असा नामजप होऊ लागला. हा नामजप होत असतांना मला आनंद मिळत होता. त्या वेळी माझे मन शांत होत होते. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी आम्हा साधकांना संतांच्या सत्संगात ठेवले’, ही त्यांची कृपाच म्हणावी लागेल. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’
– श्रीमती सुषमा पराते, नागपूर (२३.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |