Yogi model : ‘योगी आदित्यनाथ यांच्यासारखे व्हावे लागेल’ : आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा सल्ला !
अमरावती (आंध्रप्रदेश) – राज्यातील चंद्राबाबू नायडू सरकारमधील उपमुख्यमंत्री पवन कल्याण राज्याच्या गृहमंत्री अनिता यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे बनण्याचा त्यांना सल्ला दिला आणि राज्यातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सांगितले. राज्यात महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही चेतावणी दिली आहे.
१. नुकतेच एका ३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पवन कल्याण म्हणाले की, आंध्रप्रदेशातील शांतता आणि सुरक्षा यांच्या स्थितीत लक्षणीय घट झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात ज्या प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था हाताळली जात आहे, राज्यात त्याच पद्धतीने कायदा हाताळला पाहिजे.
२. राजकीय नेते आणि आमदार केवळ मते मागण्यासाठी नसतात. त्यांच्यावर दायित्व आहे. ‘मी गृहखाते मागू किंवा घेऊ शकत नाही’, असे नाही. मी तसे केल्यास, लोकांसाठी गोष्टी खूप वेगळ्या असतील. आपण योगी आदित्यनाथ यांच्यासारखे बनले पाहिजे. अन्यथा गुन्हेगार पालटणार नाहीत. त्यामुळे तुम्ही पालटणार की नाही ते ठरवा.’
३. गृहमंत्र्यांवरील उघड टीकेनंतर मतभेद होण्याची शक्यता वर्तवली जात होती; परंतु मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रीमंडळातील आणखी एक ज्येष्ठ मंत्री नारायण म्हणाले की, उपमुख्यमंत्री या नात्याने पवन कल्याण यांना चुका दाखवण्याचा आणि मंत्र्यांवर ताशेरे ओढण्याचा अधिकार आहे.