Canada Police Officer Suspended : कॅनडातील मंदिरावर आक्रमणाच्या प्रकरणी शीख पोलीस अधिकारी निलंबित

शीख पोलिसाने फडकवला होता खलिस्तानी झेंडा !

निलंबित शीख पोलीस अधिकारी हरिंदर सोही

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदु सभा मंदिराबाहेर खलिस्तानी समर्थकांच्या निदर्शनात सहभागी झालेल्या हरिंदर सोही नावाच्या पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. हरिंदर सोही येथील पील प्रादेशिक पोलीस दलात कार्यरत आहे. तो मंदिराबाहेर खलिस्तानी झेंडा फडकवतांना दिसला होता.

या संदर्भात पील पोलीस प्रसारमाध्यम अधिकारी रिचर्ड चिन यांनी सांगितले की, पोलिसांना मंदिराबाहेरील हिंसाचाराशी संबंधित चित्रीकरण सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात हरिंदर सोही निदर्शनात सहभागी होतांना दिसत आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. हिंदूंच्या मंदिराबाहेर भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आतापर्यंत ३ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस प्रमुख निशान दुरैप्पा यांनी सांगितले की, आक्रमणाची माहिती आधीच मिळाली होती. (जर माहिती आधीच मिळाली होती, तर आक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न का केले गेले नाहीत ? – संपादक) प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि व्यक्त करण्याचा अधिकार आहे; परंतु या काळात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा गुन्हा स्वीकारला जाणार नाही. हिंसाचारात सहभागी असलेल्यांना अटक करून शिक्षा केली जाईल.

पोलिसांनी या आक्रमणाशी संबंधित ३ संशयितांची ओळख पटवली आहे. यात मिसिसॉगा येथील दिलप्रीत सिंह बाऊंस, विकास, ब्रॅम्प्टन आणि अमृतपाल सिंह यांचा समावेश आहे. आणखी एका व्यक्तीला जुन्या वॉरंटवर अटक करण्यात आली आणि नंतर सोडण्यात आले.

कोणत्याही पुराव्याखेरीज आरोप करण्याची कॅनडाला सवय लागली आहे ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

परराष्ट्रमंत्री डॉ. एस् जयशंकर

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेले भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर म्हणाले की, कॅनडातील मंदिरावरील आक्रमणाचे प्रकरण चिंताजनक आहे. पंतप्रधान मोदी यांनीही याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे.

कॅनडामध्ये भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांची हेरगिरीही स्वीकारली जाणार नाही. कोणत्याही पुराव्याखेरीज आरोप करण्याची सवय कॅनडाला लागली आहे.

संपादकीय भूमिका

कॅनडाच्या पोलीस दलात खलिस्तान समर्थकांचा भरणा असल्यानेच ते खलिस्तानींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना हिंदूंना मारहाण करण्यास मोकळीक देत आहेत, हेच यातून उघड होते !