वाडे, वास्को येथील तळ्याचे व्यवस्थापन चर्च संस्थेच्या स्वाधीन करण्यास विश्व हिंदु परिषदेचा विरोध
मुरगाव पालिकेने निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी
वास्को, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – मुरगाव नगरपालिकेने वाडे, वास्को येथील तळ्याचे व्यवस्थापन चर्च संस्थेच्या स्वाधीन करण्याचा ठराव घेतला आहे. मुरगाव नगरपालिकेच्या या निर्णयाला विश्व हिंदु परिषदेच्या मुरगाव विभागाने तीव्र विरोध दर्शवला आहे. हिंदू हे तळे वर्षानुवर्षे विविध धार्मिक कृतींसाठी वापरतात. मुरगाव पालिकेच्या निर्णयामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यामुळे पालिकेने निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने केली आहे.
विश्व हिंदु परिषदेच्या पदाधिकार्यांनी या वेळी पुढील माहिती दिली.
१. वाडे येथील तळे हे वास्कोवासियांसाठी एक महत्त्वाचा जलस्रोत आहे आणि याचे खासगीकरण करणे चुकीचे आहे. या तळ्याचे व्यवस्थापन एखाद्या धार्मिक संस्थेला देणेही चुकीचे आहे.
२. विशेष म्हणजे वास्को आणि दाबोळी येथील हिंदु समाज वर्षानुवर्षे श्री गणेशचतुर्थीला श्री गणेशमूर्ती विसर्जन, गोकुळाष्टमीला श्रीकृष्ण विसर्जन, नागपंचमीच्या वेळी नागविसर्जन आणि नवरात्रीला श्रीदुर्गा विसर्जन यांसाठी या तळ्याचा वापर करत असतो. वर्षांनुवर्षे हिंदु धार्मिक परंपरेसाठी तळे वापरत असतांनाही मुरगाव पालिकेने हे तळे चर्च संस्थेच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेणे म्हणजे पालिकेला हिंदूंच्या धार्मिक भावनांशी देणेघेणे नसल्याचे दिसून येते.
३. पालिकेने तळ्याची भूमी स्वत:च्या नावाने करून घ्यावी आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ देऊ नये. जलस्रोत हा कुठल्याही संस्थेच्या मालकीचा होऊ शकत नाही, तर त्यावर केवळ सरकारचा अधिकार असावा.
४. सरकारने ‘जीसुडा’च्या माध्यमातून तळ्याचे सुशोभिकरण करून झाल्यावर ते चर्च संस्थेला देण्यामागील पालिकेचा हेतू काय आहे ? तळे केवळ देखभालीसाठी चर्च संस्थेला दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पुढे चर्च संस्था अनेक वर्षे देखभाल करून तळ्यावर त्यांचा मालकी अधिकार सांगू शकते.
५. तळ्यामध्ये एका धर्माचा पुतळा बसवण्यास आला आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्तीही बसवावी आणि सर्वांना समान न्याय द्यावा. पालिका एकंदरीत हिंदूंप्रती दुजाभाव करून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत आहे.
वाडे येथील तळे चर्चसंस्थेला द्यायचा अजून निर्णय झालेला नाही ! – मुरगाव नगरपालिका
घटनेविषयी माहिती देतांना मुरगाव पालिकेचे अधिकारी म्हणाले, ‘‘वाडे तळ्याविषयी मुरगाव पालिकेची बैठक झाली; मात्र बैठकीत वेगळीच सूत्रे चर्चेला आली आणि प्रसारमाध्यमात बातमी वेगळीच प्रसिद्ध झाली. बैठकीत झालेल्या सूत्रांची प्रत आम्ही विश्व हिंदु परिषदेला देणार आहोत. आम्ही सर्वांच्या धार्मिक भावनांचा आदर करणार आहोत. पालिकेने वाडे येथील तळे चर्च संस्थेला देखभालीसाठी द्यायचा अजून निर्णय घेतलेला नाही.’’