विधानसभा निवडणूक २०२४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघांत १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मुख्य लढत
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ मतदारसंघांतून ४ नोव्हेंबर या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण ४ जणांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. तीनही मतदारसंघांचा विचार करता प्रमुख लढत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या उमेदवारांमध्ये होणार आहे. यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे.
सावंतवाडी मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या वरिष्ठांना बंड रोखण्यात अपयश
सावंतवाडी मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांतील बंडखोरी रोखण्यात वरिष्ठांना अपयश आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बंडखोर नेत्या सौ. अर्चना घारे आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब या दोघांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे न घेता दोघे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे दीपक केसरकर, महाविकास आघाडीचे राजन तेली, अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे आणि अपक्ष विशाल परब या चौघांमध्ये मुख्य लढत होणार आहे. यांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सावंतवाडीचे माजी नगरसेवक सुनील पेडणेकर आणि दत्ताराम गावकर यांनीही माघार घेतली नसल्याने तेही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
कुडाळ मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना !
कुडाळ – कुडाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेल्या ७ पैकी महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक आणि जरांगे पाटील यांचे मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार प्रशांत नामदेव सावंत या २ अपक्ष उमेदवारांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता विद्यमान आमदार तथा महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार वैभव नाईक, महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नीलेश नारायण राणे, बहुजन समाज पार्टीचे रवींद्र कसालकर, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अनंतराज पाटकर आणि अपक्ष उमेदवार उज्ज्वला विजय येळावीकर हे ५ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात मुख्य लढत महाविकास आघाडीचे वैभव नाईक आणि महायुतीचे नीलेश राणे यांच्यात होणार आहे.
कणकवली मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
कणकवली मतदारसंघात महायुतीतील भाजपचे नितेश राणे, महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संदेश भास्कर पारकर, बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव आणि अपक्ष म्हणून संदेश सुदाम पारकर, बंदेनवाज हुसेन खानी, प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम आणि गणेश माने यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यातील प्रकाश नारकर आणि विश्वनाथ कदम यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर आणि भाजपचे नितेश राणे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या मतदारसंघात ८ पैकी २ जणांनी माघार घेतल्याने ६ जण रिंगणात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तीनही उमेदवार विजयी होणार ! – नारायण राणे, खासदार
कुडाळ – कुडाळ मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नीलेश राणे ५० सहस्र मताधिक्याने विजयी होतील. यासह कणकवली मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार नितेश राणे आणि सावंतवाडी मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर हेही मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी घेतली शरद पवार यांची भेट
सावंतवाडी – सावंतवाडी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रवीण भोसले यांच्यासह मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. पवार यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला निवडून आणण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार नितेश राणे मुसलमानांच्या नाही, तर देशद्रोह्यांच्या विरोधात !
कणकवली – कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार तथा आमदार नितेश राणे यांना मुसलमान समाजाचा पाठिंबा आहे आणि तो कायम रहाणार आहे. आमदार नितेश राणे हे कधीच मुसलमान समाजाच्या विरोधात नाहीत. ते देशद्रोह्यांच्या विरोधात बोलतात. आजपर्यंत त्यांनी मुसलमान समाजाला मोठ्या प्रमाणात साहाय्य केले आहे. राणे यांच्या विरोधात बोलणार्यांनी मुसलमान समाजासाठी आजपर्यंत काय केले ? असा प्रश्न भाजपचे कणकवली तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या ३ मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक म्हणून परवीन कुमार थिंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणभाष क्रमांक ९३५९६१४८१५, कार्यालय दूरध्वनी क्र. ०२३६२-२२३३२५ आणि ई-मेल आयडी gen.observer.sindhu2024@gmail.com, असा आहे. सर्वसामान्य नागरिक, राजकीय पक्ष अथवा त्यांचे प्रतिनिधी, निवडणूक लढवणारे उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांना भेटण्यासाठी ते कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी २ ते ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी, कुडाळ विधानसभा मतदारसंघ कार्यालय, उपविभागीय कार्यालय कुडाळ उपलब्ध असणार आहेत. त्यांचे वास्तव्य कुडाळ येथील एम्.आय.डी.सी. विश्रामगृहात असणार आहे.