प्रमुख सूत्रधार दीपश्री सावंत गावस हिला फोंडा येथे पोलिसांनी घेतले कह्यात

  • नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याची गोव्यातील विविध प्रकरणे

  • डिचोली पोलिसांनी कह्यात घेतलेली प्रिया यादव हिला ७ दिवसांची पोलीस कोठडी

पणजी, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – उसगाव येथील एका महिलेला माशेल येथील एका विद्यालयात शिक्षिकेची नोकरी देण्याचे आमीष दाखवून तिच्याकडून १५ लाख रुपये उकळण्यात आले होते. फोंडा पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार दीपश्री सावंत गावस उपाख्य दीपश्री प्रशांत महातो हिला ४ नोव्हेंबर या दिवशी दुपारी कह्यात घेतले. त्याचप्रमाणे डिचोली येथील काही जणांना रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे आमीष दाखवून त्यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी डिचोली पोलिसांनी संशयित प्रिया यादव हिला कोल्हापूर येथून कह्यात घेतले होते. संशयित प्रिया यादव हिला ४ नोव्हेंबर या दिवशी डिचोली न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने तिला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रमुख सूत्रधार दीपश्री सावंत गावस गोव्याबाहेर पसार झाली होती. ४ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ती फोंडा येथे येताच तिला कह्यात घेण्यात आले. गावकरवाडा, उसगाव येथील एका महिलेला शिक्षिकेची नोकरी देण्याच्या बहाण्याने १५ लाख रुपयांचा व्यवहार झाला होता. यामध्ये दीपश्री सावंत गावस ही मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी प्रारंभी ‘आय.आर्.बी.’ पोलीस असलेला कुर्टी, फोंडा येथील सागर नाईक याला कह्यात घेण्यात आले होते. या वेळी अन्वेषणात माशेल येथील विद्यालयातील शिक्षिका सुनीता पावसकर आणि दीपश्री सावंत गावस यांचे नाव समोर आले होते. यानंतर शिक्षिका सुनीता पावसकर हिला २८ ऑक्टोबर या दिवशी कह्यात घेण्यात आले होते. सागर सुरेश नाईक आणि शिक्षिका सुनीता शशिकांत पावसकर यांची २८ ऑक्टोबर या दिवशीच न्यायालयाने काही अटींवर जामिनावर मुक्तता केली होती, तसेच दोघांनाही ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस ठाण्यात अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याची अट घालण्यात आली होती. सुनीता पावसकर ही सागर नाईक यांची नातेवाईक असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. सुनीता आणि दीपश्री या दोघीही तिवरे, माशेल येथे कुटुंबियांसमवेत वेगवेगळ्या सदनिकांमध्ये रहातात. सुनीताला कह्यात घेतल्याचे समजताच दीपश्री पसार झाली होती आणि त्यामुले फोंडा पोलिसांनी दीपश्रीच्या विरोधात ‘लुक आऊट’ (शोध घेण्याची) नोटीस काढली होती.

नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक झालेली असल्यास पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) करा ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – राज्यात नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याची प्रकरणे वाढत राहिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘राज्यात नोकरीच्या बदल्यात पैसे घेऊन कुणाची फसवणूक झाली असेल, तर ती फसवणूक मग कुणीही केलेली असली, तरी त्याविषयी पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) करावी’, असे आवाहन केले आहे.

नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याच्या विविध प्रकरणांच्या अन्वेषणासंबंधी माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याच्या प्रकरणी प्रथम पूजा नाईक हिला कह्यात घेण्यात आले होते. तेव्हा पैसे परत मिळाल्याने ३ तक्रारदारांनी तक्रारी मागे घेतल्या होत्या. (नागरिकांच्या अशा वागण्यानेच भ्रष्टाचार्‍यांना प्रोत्साहन मिळते. नोकरीसाठी पैसे देणारेही भ्रष्टाचारीच आहेत. त्यामुळे आता जी प्रकरणे घडली आहेत, त्यांना पूर्वी पूजा नाईक हिच्या विरोधातील तक्रार मागे घेणारेही तेवढेच उत्तरदायी आहेत ! यापुढे भ्रष्टाचारविरोधी कायद्यात पैसे देणार्‍यालाही अटक करण्याचे प्रावधान असायला हवे ! – संपादक) पोलीस तपास चालू असतांना तक्रारदाराने त्याच्या म्हणण्यावर ठाम रहाणे आवश्यक असते. सरकारी नोकरीच्या बदल्यात पैसे घेतलेली कोणतीही व्यक्ती कारवाईपासून वाचणार नाही. या प्रकरणी पोलीस अन्वेषण धिम्या गतीने होत आहे असे नाही. बर्‍याचदा अशा प्रकरणांमध्ये पुरावे मागे सोडले जात नाहीत. यासाठी पोलिसांना पुरावे गोळा करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तक्रार आल्यास पोलीस कुणावरही कारवाई करण्यास मागेपुढे पहाणार नाहीत. गृह खात्याकडून तशी सूचना पोलीस दलाला देण्यात आली आहे.’’ या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पोलीस महासंचालक अलोक कुमार हेही उपस्थिती होते.