वर्ष १९७१ मधील चुकनगर हत्याकांड : ३ घंट्यांत १२ सहस्र हिंदू ठार !
हिंदू क्षीण होत चाललेला इस्लामी बांगलादेश ! (भाग ३)
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनेच सर्वत्रच्या हिंदूंचे हित साधले जाईल. त्यामुळे हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे; परंतु आज स्थिती अशी आहे की, केवळ बांगलादेश आणि पाकिस्तान येथीलच नाही, तर भारतातील हिंदूंचेही मुळात रक्षण होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीकोनातून ‘हिंदू क्षीण होत चाललेला इस्लामी बांगलादेश’ या नावाने ‘सनातन प्रभात’चे हे विशेष सदर चालू केले आहे. यातून भारतातील हिंदूंनी जागृत होऊन ‘हिंदूरक्षण’ करण्यास सिद्ध व्हावे, ही अपेक्षा !
वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धामध्ये झालेल्या चुकनगर हत्याकांडाच्या भयानक कथेचा बहुतांश भाग तेथील अधिकृत आणि कार्यालयीन कागदपत्रांमध्ये नोंदवलाच गेलेला नाही.
भाग २. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/850832.html
१. २० मे १९७१ या दिवशी झालेले चुकनगर येथील हत्याकांड
खुलना जिल्ह्यातील चुकनगर हे एक छोटेसे गाव ! त्याच्या सभोवती असलेल्या चार मैलांच्या परिसरामध्ये त्या वेळी केवळ काही तासांमध्येच साधारण १२ सहस्र हिंदूंची क्रूरपणे हत्या करण्यात आली. तो दिवस होता, २० मे १९७१ ! स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार इतक्या अल्प कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या हत्याकांडाच्या या घटनेपेक्षा दुसरी मोठी घटना नसेल !
२. चुकनगर हे हिंदूंसाठी महत्त्वाचे भौगोलिक ठिकाण !
चुकनगर हे तिन्ही बाजूंनी नद्यांनी वेढलेले असून येथील बहुतांश भूमी ही सपाट आहे. तसेच भारतातील तत्कालीन पश्चिम बंगालला जाणार्या सातखिडा या जिल्ह्याकडे जाणार्या मार्गावर हे गाव आहे. त्यामुळे वर्ष १९७१ मध्ये खुलना, बगेरहाट, जेस्सोर आणि गोपाळगंज या जवळपासच्या जिल्ह्यांतील हिंदू भारतात पळून जाण्यासाठी जमण्याचे चुकनगर हे महत्त्वाचे ठिकाण होते.
३. कोणकोण होते या हत्याकांडाच्या मागे ?
वर्ष १९७१ मध्ये रझाकार, शांती वाहिनीचे सदस्य, पाकिस्तानी सैनिक आणि पूर्व बंगालमधील साम्यवादी पक्षाचे सदस्य यांनी या भागात मोठ्या प्रमाणात दंगली, लूटमार, तसेच महिलांवर अत्याचार करून सर्व हिंदूंना ठार मारले.
४. येऊ घातलेल्या आक्रमणांविषयी अफवा !
चुकनगर हत्याकांडाच्या आधी, म्हणजेच १८ आणि १९ मे १९७१ हे २ दिवस हिंदूंवर आक्रमणे होत आहेत, अशा अफवा पसरवल्याने धुमुरिया, बाटियाघाटा, दाकोप आणि सातखिडा या ठिकाणांहून भारतात पळून जाण्याच्या उद्देशाने सहस्रावधी हिंदू चुकनगरमध्ये जमा झाले.
५. हिंदूंचे अंदाधुंदपणे केलेले हत्याकांड !
पाकिस्तानी सैन्याच्या स्थानिक हस्तकांनी हिंदू मोठ्या प्रमाणात चुकनगर येथे आल्याची माहिती पाकिस्तानी सैन्याला दिली. सकाळी १० वाजता सशस्त्र सैनिकांनी भरलेले दोन ट्रक चुकनगरमध्ये पोचले आणि असुरक्षित असलेल्या अन् याविषयी पूर्ण अनभिज्ञ असलेल्या तेथील हिंदूंवर अंदाधुंदपणे गोळीबार करण्यास आरंभ केला. या वेळी पुरुष, महिला आणि मुले यांना ठार मारण्यात आले. त्यांनी नौका, झाडांच्या आड किंवा शेतांत लपून बसण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. जेव्हा बंदुकीच्या गोळ्यांचा साठा संपला, तेव्हा सैनिकांनी संगिनीने (बंदुकीच्या पुढील टोकावर लावलेल्या धारदार पात्याने) भोसकून हिंदूंच्या क्रूर हत्या केल्या. त्यामुळे चुकनगर हे मृत्यूचे ठिकाण बनले. चुकनगर येथील पाणथळ भाग, मंदिरे, मैदाने, शाळांचे परिसर, नद्या आणि सर्व ठिकाणी हिंदूंचे मृतदेह पसरलेले होते. भद्रा नदी रक्ताने माखली. या वेळी अनुमाने ६ सहस्र ते १० सहस्र हिंदूंचे हत्याकांड झाले असावे. काहींच्या मते ही संख्या १२ सहस्र होती. केवळ २-३ घंट्यांच्या कालावधीमध्ये हे हत्याकांड झाले.
या घटनेचा साक्षीदार असलेल्या अर्शद अली मोरोळ याने या हत्याकांडाविषयीची आठवण सांगतांना म्हटले की, सहस्रो मृतदेह सर्वत्र पडले होते आणि त्यांमध्ये एक लहान मूल आपल्या मृत मातेचे स्तन तोंडात धरून चोखत होते.
६. सैनिकांकडून महिलांवर अत्याचार !
काही सैनिकांनी महिलांवर बलात्कार केला, तर काहींनी महिलांना ट्रकमध्ये घालून सोबत नेले.
७. सैनिकांकडून लूट आणि शोषण !
सैनिक आणि इतर यांनी किती व्यक्तींची हत्या केली, हे पहाण्याऐवजी मृत व्यक्तींचे सोने आणि मौल्यवान वस्तू लुटण्यास प्राधान्य दिल्याने मृतांचा खरा आकडा समोर येऊ शकला नाही. त्या वेळी १६ वर्षे वय असलेली या क्षेत्रातील तीनही हत्याकांडांतून वाचलेली शिखा बिस्वास आज ६८ वर्षांची आहे.
८. मृतदेहांची विटंबना
तिथे पडलेले मृतदेह उचलण्यासाठी स्थानिक लोकांना बळजोरी केली जात होती. बहुतांश मृतदेह भद्रा नदीमध्ये फेकून देण्यात आले. काही मृतदेह सामूहिकरित्या पुरण्यात आले. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक मृतदेहासाठी ५० पैसे देण्यात येतील, अशी घोषणा निर्लज्जपणे केली जात होती.
९. मृतांचे स्मरण करण्यासही दाखवलेली निष्क्रीयता
चुकनगर ‘शोहिद स्मृतिशोधो’ हे चुकनगरमधील हत्याकांडामध्ये मृत झालेल्यांसाठी उभारलेले स्मारक वर्ष २०१८ पर्यंत मोडकळीस आल्याचे आढळून आले. यावरून बांगलादेशातील मुसलमानांच्या मनात या हत्याकांडात बळी गेलेल्या हिंदूंविषयी कोणतीच भावना नाही कि स्थान नाही, असेच म्हणता येईल.
साभार१. हिंदु डिक्रिसेंट (बांगलादेश आणि पश्चिम बंगाल) – लेखक : बिमल प्रामाणिक, सेंटर फॉर रिसर्च इन इंडिया-बांगलादेश रिलेशन्स, कोलकाता (२०२१) २. बंगाली दैनिक ‘आनंद बाझार पत्रिका’, कोलकाता (१५.३.२०१८) ३. इंग्रजी दैनिक ‘द डेली स्टार’, ढाका (१७.१२.२०२३) ४. चुकनगर जेनोसाईड : अ हॉरिफिक स्टोरी – हफसा टुली, खुलना विद्यापीठ (रिसर्च गेट) |
(पुढील भागात वाचा : चुकनगर हत्याकांडाच्या दुसर्या दिवशी दाक्रा येथे घडलेले भयावह हत्याकांड !) |