दीपावलीनिमित्त श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले !
पुणे – अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ५ वाजता ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष श्री. तुषार कवडे, सचिव श्री. सुनील घेगडे, खजिनदार श्री. दत्तात्रय कवडे आदींच्या शुभहस्ते श्रींची महाअभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दीपावलीनिमित्त श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. प्रामुख्याने वसूबारस या दिवशी श्री विघ्नहर उद्यानामध्ये असलेल्या गायीचे पूजन करण्यात आले, लक्ष्मीपूजनदिनी श्री विघ्नहराचे अलंकार, तसेच देवस्थान ट्रस्टचे चोपडी पूजन करण्यात आले. पाडव्यानिमित्त श्री विघ्नहर मंदिरात विशेष अशी महाआरती गणेशभक्त सर्वश्री राहुल कवडे, नवनाथ कवडे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आली. भाऊबिजेच्या निमित्त ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’ आयोजित ‘दीपावली पहाट’चे आयोजन करण्यात आले होते.