सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा आणि सात्त्विक गोष्टींची आवड असलेला फोंडा (गोवा) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. श्रीहरि विवेक चौधरी (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. श्रीहरि विवेक चौधरी हा या पिढीतील एक आहे !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चि. श्रीहरि विवेक चौधरी (वय ५ वर्षे) याची त्याचे आई-वडील, आत्या आणि आजी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

(‘वर्ष २०२४ मध्ये चि. श्रीहरि विवेक चौधरी याची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे.’ – संकलक)

चि. श्रीहरि विवेक चौधरी

१. वय – १ ते २ वर्षे

 १ अ. भाव

१. ‘श्रीहरि दीड वर्षाचा असल्यापासून जेवण करत असतांना ‘श्रीकृष्ण आणि सर्व देवता यांच्या चित्रांना, तसेच प.पू. डॉक्टर आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांना घास भरवल्यानंतर स्वतः घास खातो. त्याला बोलता येत नव्हते, तेव्हापासून तो असे करतो.’

– सौ. सौख्या संदीप चौधरी (चि. श्रीहरीची आत्या) फोंडा, गोवा.

२. ‘कधी आम्ही प्रवासासाठी निघतो. तेव्हा श्रीहरि आम्हाला श्रीकृष्णाचा जयघोष, तसेच कृष्णाचा अन् सद्गुरूंचा श्लोक म्हणायची आठवण करून देतो.

२. वय – २ ते ३ वर्षे

सौ. गौरी विवेक चौधरी

२ अ. संतांनी खाऊ दिल्यावर प्रथम त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करणे आणि नंतर त्यांच्याकडून खाऊ घेणे : एकदा श्रीहरीला एका संतांचे दर्शन झाले. तेव्हा त्याला त्यांच्या जवळ जाण्याची पुष्कळ तळमळ वाटत होती. संत मार्गदर्शन करत असतांना तो मध्येच व्याकुळतेने संतांजवळ गेला. संत त्याला खाऊ देत असतांना त्याने खाऊ न घेता आधी त्यांच्या चरणांवर डोके ठेवले आणि नंतरच खाऊ घेतला. हे पाहून संतांनी त्याचे कौतुक केले.

२ आ. सत्सेवेची आवड : माझ्याकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांना घडी घालण्याची सेवा आहे. ही सेवा करतांना श्रीहरि मला म्हणतो, ‘‘मलासुद्धा सेवा करायची आहे. मी काही साहाय्य करू का ?’’

– सौ. गौरी विवेक चौधरी (चि. श्रीहरीची आई), फोंडा, गोवा.

२ इ. सात्त्विक कृती करणे : ‘श्रीहरीला ‘सूर्याला अर्घ्य देणे, तुळशीला पाणी घालणे आणि देवपूजा करणे’, या कृती पुष्कळ आवडतात. त्याला रांगोळी काढायला आवडते आणि ‘आई कशी रांगोळी काढते ?’, ते पाहून तोसुद्धा रांगोळीमध्ये रंग भरतो.’

– सौ. जयश्री अरुण माणिकपुरे (चि. श्रीहरीची आजी), फोंडा, गोवा.

२ ई. देवळात गेल्यावर भावपूर्ण दर्शन घेऊन प्रसाद घेणे : ‘श्रीहरि देवळात दर्शन घेत असतांना नमस्काराची कृती भावपूर्णरित्या करतो. तो देवाला पुन:पुन्हा नमस्कार करतो. त्याची ही कृती मंदिरातील पुजारी कौतुकाने पहात असतात. ते लगेच त्याला प्रसाद म्हणून आतून फळ आणून देतात. प्रसाद घेतांनाही ‘तो अतिशय भावपूर्णपणे प्रसाद घेत आहे’, असे मला जाणवते.’

– सौ. सौख्या संदीप चौधरी (चि. श्रीहरीची आत्या)

२ उ. लहान वयातही समजूतदारपणे बोलणे : ‘श्रीहरीला सेवा करायला आवडते. एकदा तो मला म्हणाला, ‘‘आई, मी घरातील सगळे आवरतो. तू आश्रमात सेवेला जा आणि बाबांना कामाला जाऊ दे.’’ आम्ही त्याला विचारले, ‘‘तू घरी एकटा रहाशील का ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘हो. मी घरातले सगळे आवरून एकटा घरी थांबेन.’’

– सौ. गौरी विवेक चौधरी (चि. श्रीहरीची आई)

२ ऊ. परात्पर गुरुदेवांना भेटण्याची तळमळ : ‘मे २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी श्रीहरि मला सारखे विचारत होता, ‘‘आत्या, परम पूज्य बाप्पा केव्हा येणार ?’’ त्या वेळी मी ‘श्रीमन्नारायण नारायण …।’ हे भजन म्हणत होते. श्रीहरि मला म्हणाला, ‘‘आत्या, श्रीरामबाप्पाचे भजन म्हण.’’ मी श्रीरामाचे भजन म्हणू लागले आणि काही वेळातच ध्वनीवर्धकावरून (‘स्पीकर’वरून) प्रभु श्रीरामाचे भजन चालू झाले.

२ ए. ‘नामजप केल्यामुळे देवबाप्पा रक्षण करील’, अशी दृढ श्रद्धा असणे : एकदा मी श्रीहरीला बागेत नेले होते. त्या वेळी घसरगुंडीवरून घसरतांना तो अकस्मात् ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करू लागला. तो मला म्हणाला, ‘‘नामजप केला, तर मी घसरगुंडीवरून पडणार नाही. देवबाप्पा माझे रक्षण करतो ना; म्हणून मी नामजप करतो.’’

– सौ. सौख्या संदीप चौधरी (चि. श्रीहरीची आत्या)

श्री. विवेक सुधाकर चौधरी

२ ऐ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : ‘एकदा आम्ही गाडीतून प्रवास करत होतो. तेव्हा त्याच मार्गावरून रथोत्सवातील श्री जगन्नाथ देवतेचा रथ जात होता. तेव्हा श्रीहरीला नमस्कार करायला सांगितल्यावर तो मला म्हणाला, ‘‘बाबा, मला देवबाप्पाने आशीर्वाद दिला. आपण या देवबाप्पाच्या दर्शनाला प्रतिदिन जाऊया, म्हणजे तो मला आशीर्वाद देईल !’’ मी त्याला विचारले, ‘‘रथामध्ये किती देवबाप्पा होते ?’’ तेव्हा त्याने मला ‘‘४ देवबाप्पा होते’’, असे सांगितले.

‘श्री जगन्नाथ देवतेचा रथोत्सव म्हणजे ३ देवता असतील’, असे मला वाटले होते. पुढे गेल्यावर आम्हाला तो रथ पुन्हा दिसला आणि खरेच त्या रथात श्रीजगन्नाथ, सुभद्रा अन् बलराम यांच्या समवेत श्री हनुमानही होता.’

– श्री. विवेक सुधाकर चौधरी (चि. श्रीहरीचे वडील), फोंडा, गोवा.

३. वय – ३ ते ४ वर्षे

३ अ. परात्पर गुरुदेवांप्रती भाव : ‘श्रीहरि गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर प्रतिदिन साष्टांग दंडवत घालतो आणि म्हणतो, ‘‘परम पूज्यांनी मला आशीर्वाद दिला आहे की, ‘लवकर मोठा हो, छान बाळ हो.’’

– सौ. गौरी विवेक चौधरी (चि. श्रीहरीची आई)

३ आ. मंत्र आणि मंत्राच्या देवतेप्रती दृढ श्रद्धा : ‘एकदा श्रीहरि चित्र रंगवत असतांना त्याला रंग हवे होते. मी ते रंग शोधत होते. त्या वेळी श्रीहरि मला म्हणाला, ‘‘आत्या, तू कार्तिकदादाचा (कार्तिकस्वामींचा मंत्र) नामजप कर, म्हणजे तुला ते रंग सापडतील !’’ तो मला मंत्र म्हणण्यासाठी वारंवार सांगत होता. नंतर रंग सापडल्यावर त्याला पुष्कळ आनंद झाला आणि तो म्हणाला, ‘‘तू कार्तिकदादाचा नामजप केलास ना; म्हणून तुला ते रंग मिळाले.’’

– सौ. सौख्या संदीप चौधरी (चि. श्रीहरीची आत्या)

३ इ. मायेतील गाण्यांपेक्षा नामस्मरण किंवा भजनांची अधिक आवड असणे : ‘एकदा श्रीहरि आणि मी गाडीवरून जात असतांना मी गाणी गुणगुणत होतो. त्या वेळी श्रीहरि म्हणाला, ‘‘बाबा, देवाचे काहीतरी म्हणा.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले की, ‘त्याला मायेतील गाण्यांपेक्षा नामस्मरण किंवा भजने यांची अधिक आवड आहे.’

३ ई. साधनेचे प्रयत्न नियमितपणे करणे

– श्री. विवेक सुधाकर चौधरी (चि. श्रीहरीचे वडील)

१. श्रीहरीचे काही चुकले, तर तो कान पकडून क्षमायाचना करतो.

२. श्रीहरि प्रतिदिन निद्रादेवीला प्रार्थना करून झोपतो.

३. श्रीरामकवच म्हणतांना श्रीहरि प्रत्येक अवयवांवर न्यास करतो आणि सर्व श्लोक स्वतः म्हणतो.

४. स्वभावदोष : हट्टीपणा करणे.’

– सौ. गौरी विवेक चौधरी (चि. श्रीहरीची आई), फोंडा, गोवा. (सर्व सूत्रांचा दिनांक १३.८.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.