अंधेरी रेल्वेस्थानकाबाहेर फलकाद्वारे हिंदुत्वासाठी मतदान करण्याची विश्व हिंदु परिषदेकडून जागृती !
मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘भाषा, जात, प्रांत त्यांहून मोठ हिंदुत्व’, ‘क्षत्रीय, ब्राह्मण, वैश्य, दलित नाही, तर केवळ हिंदू व्हा’, ‘हिंदु हित जिथे, माझे मत तिथे’ अशा प्रकारे मतदान करतांना हिंदुत्वासाठी मतदान करण्याचे आवाहन विश्व हिंदु परिषदेकडून करण्यात आले. राज्यातील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अंधेरी रेल्वेस्थानकाच्या बाहेर विहिंपच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन हिंदुत्वासाठी मतदान करण्याविषयी जागृती केली.
‘हिंदुत्व हाच प्राण-शंभर टक्के मतदान’, ‘बटेंगे तो कटेंगे’(विभाजित झालो, तर कापले जाऊ), विहिंपच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे हातात फलक धरून हिंदूंमध्ये जागृती केली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमानांची मते हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या विरोधात पडली होती. यावरून ‘व्होट जिहाद’ झाल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठ पक्षातील नेत्यांनी केला. हे लक्षात घेऊन येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदूंनीही हिंदुत्वासाठी मतदान करावे, यासाठी विहिंपच्या वतीने हे अभियान चालवले जात आहे.