स्वत:च्या जातीयवादाचे उदाहरण दाखवण्याचे आव्हान देणार्या शरद पवार यांचा जातीयवाद उघड करणारे जुने व्हिडिओ प्रसारित !
मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘उभ्या आयुष्यात मी कधीही जातीयवादी राजकारण केले नाही. माझ्या जातीयवादी राजकारणाचे एकतरी उदाहरण दाखवा’, असे आवाहन करणार्या शरद पवार यांच्या जातीयवादी राजकारणाचे काही जुने व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात आले आहे. यातून शरद पवार यांचा दुटप्पीपणा, खोटारडेपणा आणि जातीयवाद उघड झाला आहे.
१. यातील एक व्हिडिओ वर्ष २०१६ मधील पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्ला बोल आंदोलना’च्या समारोपाचा आहे. या कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी पुणेरी पगडी (पुणेरी पगडी ही पेशव्यांची समजली जाते) घालून शरद पवार यांचा सत्कार केला होता. या कार्यक्रमात भाषण करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांनी ‘सर्वांचा आदर करायला हवा’, असे वक्तव्य केले. त्यानंतर शरद पवार यांनी मात्र भाषणात जातीयवादी गरळओक करत ‘यापुढे सत्कारासाठी पुणेरी पगडी वापरू नका. पगडी कोणती वापरायची, हे मी सांगतो’, असे म्हणत फुले पगडी (ज्योतिबा फुले घालत होते, त्याप्रमाणे असलेली पगडी) घालण्याचा सल्ला दिला.
२. अन्य एका व्हिडिओमध्ये वर्ष २०१६ मध्ये राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर खासदार होण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांना पाठिंबा दिला. त्यावर कोल्हापूर येथील सार्वजनिक सभेत बोलतांना शरद पवार यांनी ‘जुन्या काळात छत्रपती पेशवे नेमायचे आणि पेशवे फडणीस नेमायचे. आजच्या काळात पेशवे आणि फडणीस छत्रपतींची नियुक्ती करत आहेत’, अशी नाव न घेतला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जात्यंध टीका केली होती.
३. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘शरद पवार यांनी महाराष्ट्रात जातीयवादी राजकारण केले’, असा आरोप केला. यावर पुणे येथील गोविंदबाग येथे दिवाळीच्या कार्यक्रमाच्या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना स्वत:च्या जातीयवादी राजकारणाचे एकतरी उदाहरण दाखवण्याचे आवाहन केले होते; मात्र शरद पवार यांच्या प्रसारित झालेल्या पुणे येथील वरील व्हिडिआेंतून शरद पवार यांचा जातीयवादी मुखवटा उघड होत आहे.