Geert Wilders : गीर्ट विल्डर्स यांना जिहाद्यांपासून संरक्षण देऊन झाले २ दशक !
महंमद पैगंबर यांच्या विरुद्ध कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप !
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि कट्टर इस्लामविरोधी खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ४ नोव्हेंबरला केलेल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, ‘४ नोव्हेंबर, २००४ ! आजपासून बरोबर २० वर्षांपूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्तव मला कँप झेस्ट तुरुंगात ठेवण्यात आले होते. आधी ‘बॅरॅक’ (कारागृहातील खोली), नंतर पोलीस ठाणे आणि आता एका सुरक्षित घरात ! त्या वेळी माझे सहकारी खासदार अयान हिरसी अली यांनाही सुरक्षा देण्यात आली होती.’ या पोस्टला गिल्डर्स यांनी त्या काळातील एका वर्तमानपत्रात छापलेल्या संबंधित बातमीचे चित्र जोडले आहे.
वर्ष २००४ मध्ये विल्डर्स यांनी महंमद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तेव्हापासून आजतागायत म्हणजेच गेली २० वर्षे त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे गेली २ दशके त्यांना पोलिसांच्या संरक्षणातच जगावे लागत आहे.