Canada Hindu Temple Khalistani Attack : कॅनडात मंदिरावर खलिस्तान समर्थकांचे आक्रमण

  • हिंदु भाविकांना मारहाण !

  • पंतप्रधान ट्रुडो यांच्याकडून निषेध

मंदिरावर खलिस्तान समर्थकांचे आक्रमण

ब्रँप्टन (कॅनडा) – येथील हिंदु सभा मंदिरात खलिस्तान समर्थकांनी घुसून हिंदु भाविकांवर आक्रमण केले. ही घटना ३ नोव्हेंबरच्या सकाळी घडली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या आक्रमणाचा निषेध केला. ट्रुडो म्हणाले की, ब्रँप्टनमधील हिंदु सभा मंदिरात झालेला हिंसाचार अस्वीकारार्ह आहे. कॅनडातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचा धर्म स्वतंत्र आणि सुरक्षितपणे पाळण्याचा अधिकार आहे.


काय घडले ?

खलिस्तानी त्यांचा ध्वज घेऊन मंदिराबाहेर पोचले होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी मंदिराच्या आवारात प्रवेश करून हिंदु भाविकांना लाठ्यांनी मारहाण केली. या वेळी महिला भाविकांवरही आक्रमण करण्यात आले. हिंदु भाविकांनी त्यांना विरोध करण्याचाही प्रयत्न केला आणि त्यांच्यात धक्काबुक्कीही झाली. या घटनेचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.

हिंदु भाविकांवर झालेल्या आक्रमणामुळे कॅनडामध्ये तणाव वाढला आहे. मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पील प्रादेशिक पोलीस प्रमुख निशान दुराईपा म्हणाले की, आम्ही शांततेने आणि सुरक्षितपणे निषेध करण्याच्या अधिकाराचा आदर करतो; परंतु हिंसाचार आणि गुन्हेगारी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल.


आपला देश हिंदूंचे संरक्षण करण्यास सक्षम नाही ! – कॅनडाचे विरोधी पक्षनेते

कॅनडाचे विरोधी पक्षनेते पिये पॉलीएव्हरा यांनी मंदिरावरील आक्रमणाचा निषेध केला. ते म्हणाले की, आपला देश हिंदूंचे संरक्षण करण्यास सक्षम नाही.

ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, हे खूप निराशाजनक आहे.

हिंदूंचे आणि मंदिरांचे संरक्षण करा ! – भारताची कॅनडा सरकारकडे मागणी

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल

नवी देहली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, आम्ही हिंदु सभा मंदिरात कट्टरतावादी आणि फुटीरतावादी यांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध करतो. सर्व प्रार्थनास्थळे अशा आक्रमणांपासून सुरक्षित रहातील, याची निश्‍चिती करण्यासाठी आम्ही कॅनडा सरकारला आवाहन करतो. कॅनडाच्या सरकारने हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे. कॅनडामधील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण यांविषयी आम्ही अत्यंत चिंतित आहोत.

कॅनडा कट्टरतावाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनले आहे ! – टोरंटोचे खासदार केविन वुओंग

टोरंटोचे खासदार केविन वुओंग यांनीही या आक्रमणाचा निषेध केला. ते म्हणाले की, कट्टरतावाद्यांसाठी कॅनडा सुरक्षित ठिकाण बनले आहे. देशाचे नेते हिंदूंचे संरक्षण करण्यात अयशस्वी ठरले आहेत, जसे ते ख्रिस्ती आणि ज्यू यांचे संरक्षण करण्यात अयशस्वी ठरले आहेत.

खलिस्तानी आतंकवाद्यांनी सीमा ओलांडली ! – खासदार चंद्रा आर्य

खासदार चंद्रा आर्य

भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य म्हणाले की, खलिस्तानी आतंकवाद्यांनी सीमा ओलांडली आहे. अशा घटना कॅनडातील निर्लज्ज हिंसक आतंकवाद्यांच्या उदयाचे प्रतिबिंब आहे. खलिस्तान्यांनी मंदिरातील भाविकांवर केलेले आक्रमण आतंकवाद्यांचा कॅनडामध्ये किती खोलवर शिरकाव झाला आहे, हे दाखवतो. खलिस्तानी आतंकवाद्यांना भाषण स्वातंत्र्याखाली मोकळीक मिळाली आहे. कॅनडातील हिंदूंनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि हक्कांसाठी लढण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यांनी त्यांच्या नेत्यांवर दबाव आणला पाहिजे.

‘हिंदू कॅनेडियन फाऊंडेशन’ने म्हटले की, खलिस्तानी आतंकवादी हिंदु सभा मंदिरावर आक्रमण करत आहेत. लहान मुले, महिला आणि पुरुष यांवर आक्रमणे होत आहेत. हे सर्व खलिस्तानी राजकारण्यांच्या समर्थकांच्या चिथावणीवरून होत आहे.

कॅनडातील सरकार अशा प्रकारांवर राजकारण करत आहे ! – अमेरिकी खासदार श्री ठाणेदार

अमेरिकी खासदार श्री ठाणेदार

या घटनेचा अमेरिकेतील खासदार श्री. श्री ठाणेदार यांनीही निषेध केला. ते म्हणाले की, मी अमेरिकेत हिंदु संघटनेची स्थापना केली आहे. अमेरिकेतील हिंदूंच्या मंदिरांवर होणार्‍या आक्रमणांविषयी मी अमेरिकेच्या गृह विभागाशी असंख्य वेळा बोललो आहे. आता कॅनडातील सरकार अशा प्रकारांवर राजकारण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सरकार कॅनडातील काही अल्पसंख्यांक गटांचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कॅनडात हिंदूंवर झालेले आक्रमण एक आतंकवादी कृती असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अशा प्रकारच्या आक्रमणांना कॅनडा सरकारकडून दिल्या जाणार्‍या संरक्षणाचा निषेध केला जायला हवा. बांगलादेशमधील हिंदु अल्पसंख्यांकांप्रमाणेच कॅनडातील हिंदू अल्पसंख्यांकांनादेखील मूलभूत मानवी अधिकार आहेत. त्यांचे संरक्षण व्हायला हवे. मी या प्रकारांना आळा घालण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. अल्पसंख्यांक, मग ते बांगलादेशामधील असोत किंवा अमेरिका वा कॅनडातील असोत, त्यांच्या विरोधात होणार्‍या या गुन्ह्यांची गांभीर्याने नोंद घेण्यासाठी अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनावर दबाव टाकण्याचा मी वारंवार प्रयत्न केला आहे.

अखिल भारतीय संत समितीकडून विरोध

कॅनडातील मंदिरावरील आक्रमणानंतर अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रनंद सरस्वती यांनी म्हटले की, हा हिंदुविरोधी जागतिक कटाचा भाग आहे. ट्रुडो सरकार या आक्रमणाला खलिस्तानी आक्रमण सांगून त्यातून सुटू शकत नाही. जगभर अहिंसेचा संदेश देणार्‍या सनातन धर्मियांच्या मंदिरांवर आक्रमणे झाली, तर तेथील सरकार अपयशी ठरले आहे, असे मानले पाहिजे. याप्रकरणी भारत सरकारने भूमिका मांडावी.

‘ओंटारियो सिख आणि गुरुद्वारा कौन्सिल’कडून मंदिरावरील आक्रमणाचा निषेध  

ओटावा (कॅनडा) – मंदिराबाहेर घडलेली घटना दुःखद आहे. आम्ही कॅनडातील सर्व धर्मांच्या आणि समुदायांच्या लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहोत अन् आम्हाला ‘प्रत्येकाला सुरक्षित आणि निर्भय वाटेल’, असे वातावरण निर्माण करायचे आहे. अन्वेषण यंत्रणांनी या प्रकरणाचे गांभीर्याने अन्वेषण करावे; कारण आपल्या समाजात हिंसेला स्थान नाही. एकता आणि दयाळूपणा यांचे वातावरण निर्माण करण्यासाठी समाजाचे नेते एकत्र येतील, अशी आशा आहे, असे निवेदन ‘ओंटारियो सिख आणि गुरुद्वारा कौन्सिल’ने ब्रॅम्प्टन येथील मंदिरावरील आक्रमणानंतर प्रसारित केले आहे.

दिवाळीनिमित्त मंदिरात गेले पंतप्रधान ट्रुडो !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

या आक्रमणापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडातील हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला. व्हिडिओमध्ये ट्रुडो त्यांच्या मनगटावर बांधलेल्या पवित्र धाग्यांकडे निर्देश करत म्हणाले, ‘मला हे धागे मी गेल्या काही महिन्यांत ३ वेगवेगळ्या हिंदु मंदिरांमध्ये गेलो होतो, त्या वेळी बांधण्यात आले. हे सौभाग्य आणतात, सुरक्षा देतात. मी हे तोपर्यंत काढणार नाही, जोपर्यंत हे पडत नाहीत.’

संपादकीय भूमिका

दिवाळीच्या दिवसांत खलिस्तानी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करतात, त्यावर ट्रुडो कठोर कारवाई करणार आहेत का ? हाच प्रश्‍न आहे. ट्रुडो कितीही वेळा मंदिरात गेले, तरी हिंदूंना त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे !

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो उघडपणे आतंकवाद्यांचे समर्थन करतात ! – कॅनडाचे पत्रकार डॅनियल बोर्डमन यांचा घरचा अहेर

कॅनडाचे पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी स्वतःच्या देशाच्या सरकारला घरचा अहेर दिला आहे. त्यांनी मंदिरावरील आक्रमणाच्या घटनेविषयी म्हटले की, कॅनडामध्ये पूर्वी सिनेगॉग (ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ) आणि चर्च यांसारख्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आले होते; परंतु ताजी घटना हिंदु  भाविकांवरील हिंसाचारात झालेली चिंताजनक वाढ दर्शवते. या देशात दिवसाढवळ्या भाविकांवर झालेले हे पहिलेच आक्रमण आहे. ही घटना थांबवायला हवी होती. कॅनडा सरकार हिंदूंची बाजू घेत नाही. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो कधी उघडपणे आतंकवाद्यांचे समर्थन करतात, तर कधी मौन बाळगतात. ते त्यांचे काम पार पाडत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत ते या संदर्भात ठोस कृती करतांना दिसत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्याचे कारण नाही. पंतप्रधान अशा आक्रमणांचा निषेध करणारी विधाने जारी करू शकतात; परंतु अद्याप योग्य कारवाई केलेली नाही. ट्रुडो यांचा कार्यकाळ कायम राहिल्याने दोन्ही देशांमधील संबंध निराशाजनक आहेत. ताणलेले राजनैतिक संबंध लवकर सुधारण्याची शक्यता नाही.

संपादकीय भूमिका

कॅनडामध्ये खलिस्तान्यांना ट्रुडो सरकारकडून भारत आणि हिंदु यांच्या विरोधात कारवाया करण्यासाठी पूर्ण मोकळीक देण्यात आली असल्यानेच अशा घटना सातत्याने घडत आहेत. कॅनडाचे नाक दाबण्यासाठी भारत प्रयत्न करत असला, तरी ते प्रयत्न अपुरेच ठरत आहेत, हेच यातून लक्षात येत असल्याने भारताने आता कॅनडावर संपूर्ण बहिष्कार घालणेच योग्य ठरील !