दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ज्यांना गद्दार म्हटले जाते, ते मुख्यमंत्री होतात ! – बंडखोर नेते; सरवणकरांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा ?…

निवडणूक विशेष !

ज्यांना गद्दार म्हटले जाते, ते मुख्यमंत्री होतात ! – बंडखोर नेते

ठाणे – कल्याण पूर्व विधानसभेत शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. कल्याण पश्चिम विधानसभेत भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. या पार्श्वभूमीवर ‘ज्यांना गद्दार म्हटले जाते, ते मुख्यमंत्री होतात’, असे विधान जिल्ह्यातील एका नेत्याने केले आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला मानला जातो; मात्र दोन्ही पक्षातील पदाधिकारी एकमेकांविरोधात काही ना काही बोलत असतात.


सरवणकरांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा ?

एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न झाले; परंतु सरवणकरांनी माघार घेतली नाही; परंतु सरवणकर यांनी माघार घेऊ नये, यासाठी आता मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असल्याचे चित्र आहे.

गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  ‘पुढील मुख्यमंत्री भाजपचा होईल. माझे निवडणूक चिन्ह मतदारांनी मतदान केल्याने मिळाले आहे. ते मी ढापलेले नाही. मला न्यायालयाने दिलेले नाही’, असे म्हटले होते.  ही विधाने मुख्यमंत्र्यांना खटकल्याची चर्चा आहे.


निकाल लागल्यावर कळेल कोण ‘किंगमेकर’ – संजय राऊत, खासदार

संजय राऊत

मुंबई – निकाल लागल्यावर कळेल कोण ‘किंगमेकर’ (राजा बनवणारा) आणि कोण ‘किंग’ (राजा) आहे ते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येईल. या राज्यामध्ये २६ नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले असेल. कोण काय  बोलतय ? कुणाचे काय दावे आहेत ? हे आता कशाकरता बोलायचे ? अजित पवारांसह आधी सर्वांनी जिंकून या, बारामती आता सोपी राहिलेली नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले.


फडणवीस यांना किम जोंगपासून धोका आहे का ? – संजय राऊत

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस

मुंबई – राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत:ची सुरक्षा वाढवली आहे आणि जनता वार्‍यावर सोडलीय. हत्या, बलात्कार, मारामार्‍या होत असतांना त्यांनी ‘फोर्स वन’चा सगळा ‘फोर्स’ आमच्यासाठी लावला आहे. आम्हाला समजायला हवे की, त्यांना कुणापासून धोका आहे. लिबिया, युक्रेन, नॉर्थ कोरिया, किम जोंग उनपासून धोका आहे का ?, गृहमंत्री दुसर्‍यांना सुरक्षा देतात; पण हे स्वतःला सुरक्षा घेत आहेत. देवेंद्र फडणवीस कुणाला घाबरले आहेत ? अशी उपाहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली आहे.


संदीप नाईक भाजप सोडणार ?

संदीप नाईक

नवी मुंबई – भाजपच्या पहिल्या सूचीत नाव नसल्याने संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला होता; परंतु दुसर्‍या सूचीत त्यांचे नाव आल्याने ते आता भाजपमध्येच रहातील. आता त्यांचा मुलगा शरद पवार गटात जाण्याची चर्चा आहे.