पुणे येथे देवेंद्र फडणविसांकडून अप्रसन्न मंडळींची मनधरणी !

पुणे – भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार संजय काकडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी आमदार जगदीश मुळीक या सर्व इच्छुक मंडळींची प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीच्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर हे उपस्थित होते.

तिकीट न मिळाल्याने हे सर्व अप्रसन्न होते. ते बंडखोरीच्या स्थितीत होते. या भेटीनंतर भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून कसबा मतदारसंघात काम करीत आलो आहे. यंदा विधानसभा निवडणुकीची सिद्धता केली होती. माझ्यासह कार्यकर्तेही अप्रसन्न होते; पण पक्षाच्या आदेशानुसार निवडणुकीत काही वेळात सहभागी झालो आणि आज भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरी येऊन भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार आल्यावर तुमचा निश्चित सन्मान केला जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.