मुंबई येथील ‘इंडियन एअरलाईन्स आयडियल’ या शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारली लोहगडाची प्रतिकृती ! 

शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ बनवलेली लोहगडाची प्रतिकृती

मुंबई – दिवाळीनिमित्त कलिना येथील ‘इंडियन एअरलाईन्स आयडियल’ या शाळेतील कलाशिक्षक आणि विद्यार्थी यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लोहगडाची प्रतिकृती बनवली आहे. या ऐतिहासिक गडाची सुंदर प्रतिकृती बनवल्याविषयी सर्व पालक, शिक्षक आणि नागरिक यांच्यांकडून शाळेचे कलाशिक्षक श्री. पवन तांडेल आणि विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे. ‘प्रतीवर्षी अशाच प्रकारे गडांच्या प्रतिकृती बनवा; जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होईल’, अशा प्रतिक्रिया व्यक्त करून प्रोत्साहन देत आहेत. सनातनचे साधक आणि शाळेचे कलाशिक्षक श्री. पवन तांडेल अन् शाळेतील इयत्ता सहावी आणि सातवी यांचे विद्यार्थी यांनी या गडाची प्रतिकृती सिद्ध केली आहे. गेल्या ५ वर्षांपासून ते दिवाळीनिमित्त महाराष्ट्रातील विविध गडांच्या प्रतिकृती सिद्ध करतात. विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टाने, उत्साहाने सहभाग घेऊन ८ ते १० दिवसांत हा गड बनवला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हा गड दाखवून बालवयातच त्यांच्या मनामध्ये राष्ट्राविषयी प्रेम, तसेच शौर्य, पराक्रम यांची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थ्यांचे पालक मुलांना शाळेत सोडायला येत होते, तेव्हा गड बनवण्याची प्रक्रिया चालू असतांनाही त्यांना तो आवडल्याने त्यांनी यासमवेत ‘सेल्फी’ काढून ‘स्टेट्स’वर ठेवले. ‘राष्ट्राविषयी प्रेम निर्माण व्हावे, क्षात्रवृत्ती निर्माण व्हावी, तसेच तेव्हाच्या तत्कालीन स्थितीत गडाचे महत्त्व काय होते ? याविषयी समाजाला माहिती व्हावी म्हणून दिवाळीत घराबाहेर गड का बांधतात ? मुलेच गड का बांधतात ? त्या पाठीमागचा हेतू काय ?’ याविषयी फलक सिद्ध करून ते प्रतिकृतीजवळ ठेवण्यात आले आहेत. सर्वांना बोधप्रद माहिती मिळाली.