संत वासुदेव महाराजांचे श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र आळंदीपर्यंत पायी दिंडी !
वारकर्यांचा काढला जाणार विमा, श्रीक्षेत्र सिद्ध बेट येथे होणार पारायण !
खामगाव (जिल्हा बुलढाणा) – येथील संत वासुदेव महाराजांच्या श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्री क्षेत्र आळंदी देवाच्या पायी दिंडीचे आयोजन केले आहे. या दिंडीचे आयोजन ४ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत केले आहे. ही दिंडी श्री क्षेत्र श्रद्धासागर अकोट मार्ग, लामकाणी, शेगाव, खामगाव, वैरागड, जाफराबाद, छत्रपती संभाजीनगर, शिरूर, शिक्रापूर मार्गे आळंदी येथे पोचणार आहे. दिंडीत सहभागी वारकर्यांचा विमा काढण्यात येणार आहे. अकोट येथील ‘संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थे’च्या वतीने या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे.
संत वासुदेव महाराजांनी ज्ञानराज माऊलींच्या दर्शनार्थ आजन्म आळंदी वारी केली. या गुरुपरंपरेला उजाळा देत श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र आळंदी देवाची पायी दिंडीचे आयोजन केले. श्रींची आळंदी वारी युगानुयुगे चालू रहावी, या भावाने संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारे १२ वर्षांपासून श्रींचा आळंदी दिंडी सोहळा आयोजित करण्यात येत आहे. दिंडीत प्रवेश घेणार्या भक्तांसाठी प्रवेश निःशुल्क असून वारी करणार्या वारकर्यांची भोजन, निवास आणि वैद्यकीय सुविधा आहे.
दिंडी सोहळ्याचे प्रमुख, संस्थेचे अध्यक्ष वासुदेव महाराज महल्ले या दिंडीत सहभागी होतील. श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथून ही दिंडी ४ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता प्रस्थान करणार आहे. दिंडीचा मार्ग श्री क्षेत्र श्रद्धासागर अकोट, लामकाणी, शेगाव, खामगाव, वैरागड, जाफराबाद, छत्रपती संभाजीनगर, शिरूर, शिक्रापूर मार्गे आळंदी असा राहील. २० नोव्हेंबर या दिवशी दिंडी आळंदी येथे पोचणार आहे. २१ ते २८ नोव्हेंबर पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या पारायण पिठाचे नेतृत्व दिंडी व्यवस्थापक ह.भ.प. अंबादास महाराज मानकर करणार आहेत.