साधकांना आधार देणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रावणी श्रीपाद पेठकर !

‘कु. श्रावणी पेठकर यांची त्यांच्या सहसाधिकांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. श्रावणी पेठकर

१. सहजता आणि नम्रता

‘कु. श्रावणी उन्नत साधक आणि संत यांच्याशी सहजतेने अन् आदराने बोलतात. त्या वयस्कर आणि समवयस्क व्यक्ती अन् लहान मुले यांच्याशी आपुलकीने बोलतात. त्या कधीही कुणाच्या मनाला लागेल, असे बोलत नाही.

सौ. अंजली श्रीपाद अरगडे

२. सहनशील

त्यांना त्रास होत असल्यास त्या इतरांना तसे जाणवू देत नाहीत, तसेच त्या स्वतःला होणार्‍या त्रासांचा साधनेवर परिणाम होऊ देत नाहीत. त्या त्रास सहन करत स्थिर राहून सेवा करतात.

३. परिपूर्ण सेवा करणे

श्रावणी त्यांच्याशी संबंधित सेवा करणार्‍या साधिकांमध्ये वयाने लहान असूनही श्रावणी यांच्याकडे सेवेचे दायित्व अधिक आहे. त्या सेवा मनापासून आणि परिपूर्ण करतात.

४. साधकांना आधार देणे

साधकांना त्यांचा आधार वाटतो. आम्हाला काही अडचण आल्यास आम्ही त्यांना विचारतो. त्या साधकाची अडचण सुटेपर्यंत साहाय्य करतात. त्यांचे बोलणे सकारात्मक असते. त्यांनी सहसाधकांचे पालकत्व घेतले आहे.

कु. अवनि छत्रे

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव

श्रावणी अनेक वेळा भावस्थितीत असतात. त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू येतात. त्या सतत म्हणतात, ‘‘मला श्री गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) पुष्कळ आठवण येते.’’ एवढ्या लहान वयात अशी उच्च भावस्थिती प्राप्त करून देवासाठी रडणारे साधक विरळाच !

६. कु. श्रावणी यांनी साधनेविषयी सांगितलेली सूत्रे येथे दिली आहेत.

६ अ. अंतर्मुख होऊन गुरूंना अपेक्षित अशी साधना करायला हवी ! : पूर्वीच्या काळी शिष्य गुरूंच्या आज्ञेने भिक्षा मागणे, आश्रमात शारीरिक सेवा करणे आणि अत्यल्प सोयी सुविधांमध्ये रहाणे, असे करत असत. आपल्या गुरूंनी आपल्याला आवश्यक ते सर्व दिले आहे. ‘आपण त्यांना अपेक्षित अशी साधना करत आहोत का ?’, याचे सखोल चिंतन केल्यास आपली अंतर्मुखता वाढेल.

६ आ. आपल्याकडे जे आहे, त्यात समाधान मानून कृतज्ञता व्यक्त करायला हवी ! : समाजात काही व्यक्ती अपंग असतात, तर काही जणांना मानसिक त्रास असतात, तरीही ते चिकाटीने प्रयत्न करतात आणि आनंदी असतात. ‘देवाने आपल्याला आवश्यक ते देऊनही ‘आपल्याकडे काय नाही’, याकडे आपण लक्ष केंद्रित का करतो ?’, याचा अभ्यास करायला हवा. आपल्याकडे जे आहे, त्याबद्दल आपल्या मनात कृतज्ञताभाव असेल, तर आपण समाधानी असतो.

६ इ. अपेक्षा न करता झोकून देऊन सेवा केल्याने आनंद मिळतो : आपण कोणतीही कृती करण्यापूर्वी आधीच ‘हे होणार नाही’, असा विचार करून त्यात वेळ घालवतो. आपण अपेक्षा न करता सेवा आणि साधना करून त्यांची फलनिष्पत्ती पूर्णतः ईश्वरावर सोपवावी. असे केल्याने आपल्याला उत्साह वाटून झोकून देऊन प्रयत्न करता येतात आणि त्यातून आनंदही मिळतो.

‘गुरुकृपेने कु. श्रावणी यांच्याकडून आम्हाला साधनेची सूत्रे शिकायला मिळाली’, त्याबद्दल आम्ही गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– सौ. अंजली श्रीपाद अरगडे (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा आणि कु. अवनि छत्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०२४)