अंतर्मुखता वाढवण्याच्या संदर्भात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी साधिकेला ‘तू श्रद्धा वाढव. गुरु तुला सदैव साहाय्य करतील’, असे सांगणे
‘साधारण दोन ते अडीच मासांपूर्वी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी मला सांगितले, ‘‘तू श्रद्धा वाढव. गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुला सदैव साहाय्य करतील. ’’ त्यांचे हे वाक्य मी ऐकले. त्या वेळी माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रताच इतकी अधिक होती की, ‘श्रद्धा वाढवल्याने मी काय भाव अनुभवणार ?’, असे मला वाटले; परंतु सद्गुरु काकांचे ते शब्द माझ्या अंतर्मनात गेलेलेच होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधिकेला तिच्यातील बहिर्मुखतेची जाणीव करून देऊन प्रयत्न करण्यास सांगणे
त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी माझा सत्संग घेऊन मला माझ्यातील बहिर्मुखतेची जाणीव करून दिली आणि ती न्यून करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले. त्यानंतर हळूहळू मला अंतर्मुखतेची जाणीव होऊ लागली.
३. ‘श्रद्धा नसते, तेव्हा मन बहिर्मुख असते आणि श्रद्धा असली की, मन अंतर्मुख असते’, हे वाक्य साधिकेला अंतर्मनातून ऐकू येणे
त्या वेळी देवाने मला पुढील वाक्य सांगितले. ते मला स्फुरलेले नसून मला अंतर्मनातून ऐकू आले. ‘देवाचा आवाज’, असे आपण म्हणतो ना, तसेच काहीसे हे असावे’, असे मला वाटते. ते वाक्य म्हणजे ‘श्रद्धा नसते, तेव्हा मन बहिर्मुख असते. श्रद्धा असली की, मन अंतर्मुख असते.’
४. साधिकेची झालेली विचारप्रक्रिया
माझ्या अंतर्मनातील या वाक्यावर माझी पुढीलप्रमाणे विचारप्रक्रिया झाली. माझ्या मनात आले, ‘गुरु माझ्या मनातील प्रत्येक विचार, कृती आणि कृतीमागील उद्देश इत्यादी सर्व जाणतात. ‘त्यांना सर्व ठाऊक आहे’, ही श्रद्धा असेल, तर आपण योग्य तेच करणार. इतर कुणी चुकू देत किंवा कसेही वागू देत, मला मात्र योग्य तेच करायचे आहे. जर प.पू. डॉक्टरांच्या समोर मला कुणी माझी चूक सांगितली, तर मी स्पष्टीकरण देणार नाही किंवा ‘माझी चूक नाही, समोरच्या व्यक्तीचीच चूक आहे’, असेही मी म्हणणार नाही. श्रद्धा असेल, तर मला प्रत्येक क्षणी ‘योग्य काय आहे’, याचे आकलन होऊन ते अनुभवताही येणार आहे.
‘प.पू. डॉक्टर, अजूनही मी अंतर्मुख झालेले नाही; परंतु सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांच्या वरील वाक्याच्या माध्यमातून मला तुमचाच (देवाचाच) आवाज ऐकू आला. ‘प.पू. डॉक्टर, तुम्ही माझी श्रद्धा अशीच दृढ करून माझी वृत्ती अंतर्मुख करा, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०२३)