निवडणूक कालावधीत ‘ओपिनियन’ आणि ‘एक्झिट पोल’ला प्रतिबंध !
कोल्हापूर – निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कालावधीत निवडणूक निकालांचे कल आणि अंदाज (‘ओपिनियन पोल’, तसेच ‘एक्झिट पोल’) दर्शवण्यावर प्रतिबंध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांत २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज १३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६.३० पर्यंत कोणत्याही प्रकारच्या ‘एक्झिट पोल’चे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमाद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू रहाणार आहे. त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी ४८ घंट्यांच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांचे प्रकाशन अथवा प्रसारण यांवर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.