Narasimha Warahi Brigade :  सनातन धर्माच्या रक्षणासाठी आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी स्थापन केली ‘नरसिंह वाराही ब्रिगेड’ !

(वाराही एका देवीचे नाव आहे. तांत्रिक उपासनेत तिला अधिक महत्त्व आहे. वराह अवताराची शक्ती ती वाराही !)

अमरावती (आंध्रप्रदेश) – दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि जनसेना पक्षाचे प्रमुख असणारे आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी त्यांच्या पक्षात ‘नरसिंह वाराही ब्रिगेड’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सनातन धर्माचे रक्षण करणे, हा या ब्रिगेडचा मुख्य उद्देश असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘राज्यातील कोणत्याही गटाने किंवा व्यक्तीने धर्माचा अपमान केल्यास आमचा पक्ष खपवून घेणार नाही’, अशी स्पष्ट चेतावणी पवन कल्याण यांनी दिली.

१. पवन कल्याण यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, मी सर्व धर्मांचा आदर करतो; परंतु मी माझ्या श्रद्धेवर ठाम आहे. जे लोक सामाजिक माध्यमांवर सनातन धर्मावर टीका करतात किंवा त्याविषयी अनादराने बोलतात, त्यांना परिणाम भोगावे लागतील; म्हणून मी एक समर्पित शाखा स्थापन करत आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी माझ्या शाखेचे नाव ‘नरसिंह वाराही ब्रिगेड’ आहे.

पवन कल्याण करणार ‘नरसिंह वाराही ब्रिगेड’ स्थापन

२. प्रत्येक हिंदूने आपल्या धर्माचा आदर करण्यासमवेतच शिस्तही शिकली पाहिजे, असेही ते या वेळी म्हणाले. यासमवेत त्यांनी आंध्रप्रदेशाच्या धर्मादाय विभागाला इतर धर्मांचा अपमान करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहनही केले. असे वर्तन रोखण्यासाठी समाजात जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

सनातन धर्माच्या रक्षणार्थ कृतीशील होणारे पवन कल्याण यांचे अभिनंदन !