VishvaMitra Goal For INDIA : काही देश अधिक जटिल असले, तरी भारताला ‘विश्‍व मित्र’ बनायचे आहे ! – डॉ. एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली : काही जागतिक भागीदार देश जगातील इतरांपेक्षा अधिक जटिल असू शकतात; कारण ते नेहमीच परस्पर आदराची संस्कृती किंवा राजनैतिक सौजन्याची परंपरा सामायिक करत नाहीत, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता टीका केली. ही टीका अमेरिका, कॅनडा आणि चीन यांच्यावर करण्यात आल्याची चर्चा होत आहे. त्याच वेळी ‘भारताचे ‘विश्‍व मित्र’ (जागतिक मित्र) बनण्याचे ध्येय जगभरात मैत्री वाढवणे हे आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. जयशंकर देहलीमध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.

डॉ. एस्. जयशंकर म्हणाले की,

१. भारत स्वतःला जागतिक मित्र म्हणून स्थापित करू इच्छित आहे आणि अधिकाधिक देशांशी मैत्री प्रस्थापित करू इच्छित आहे. आजच्या उदयोन्मुख बहुशक्तींच्या जगात ‘विशेष मैत्री’ (काहीच देशांशी मैत्री) अशी एकांगी राहिलेली नाही. अशी मैत्री विकसित करण्यामागे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कारणे आहेत. जगाशी संबंध ठेवण्याची भारताची क्षमता त्याच्या आत्मविश्‍वासाला कारणीभूत ठरते.

२. आम्ही आमच्या देशांतर्गत विषयांवर वेळोवेळी प्रतिक्रिया पाहिल्या आहेत. तथापि, इतर पक्षांना (देशांना) क्वचित्च समान सौजन्य दिले जाते. एकासाठी स्वातंत्र्य म्हणजे दुसर्‍यासाठी हस्तक्षेप होऊ शकतो. वस्तुस्थिती अशी आहे की, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांसारखे संवेदनशील विषय भागीदारांशी असलेल्या संबंधांच्या मूल्यांकनात महत्त्वाचे घटक ठरतात.