महाराष्ट्रात एकाच नावाचे एकाहून अधिक उमेदवार असल्याने मतदारसंघांत लढती चुरशीच्या होणार ?
सांगली, २ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ८ सहस्रांहून अधिक जणांनी उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले होते, त्यात ७ सहस्र ९९४ उमेदवारांचे उमेदवारी आवेदन छाननीनंतर योग्य असल्याचे आढळून आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने दोन्ही आघाड्यांतील नेत्यांना बंडखोरांचे मन वळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागणार आहेत. काही जागांवर एकाच नावाचे एकाहून अधिक उमेदवार उभे राहिल्याने लढत रंजक बनली आहे. राज्यात अद्यापही नामांकन प्रक्रिया चालू आहे.
निवडणुकीत तत्सम नावाचे उमेदवार उभे करणे हा निव्वळ योगायोग नसून रणनीतीचा भाग आहे, हे तर उघडच आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांतील उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला आहे; मात्र एकाच नावाचे अनेक उमेदवार अनेक जागांवर लढत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, यासाठी हे केले आहे.
पुणे येथे पर्वती जागेवर ३ महिला अश्विनी नावाच्या !
पुणे जिल्ह्यातील पर्वती विधानसभा जागेवर भाजपच्या माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांच्यात मुख्य लढत आहे; मात्र अश्विनी नावाच्या ३ उमेदवार रिंगणात असून त्यात अश्विनी कदम नावाच्या २ महिलांनीही उमेदवारी प्रविष्ट केली आहे.
मुक्ताईनगर जागेवर एकाच नावाचे एकाहून अधिक उमेदवार !
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर जागेवर एकाच नावाचे एकाहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार रोहिणी एकनाथ खडसे यांच्याशी लढत आहे. याशिवाय २ महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. रोहिणी पंडित खडसे आणि रोहिणी गोकुळ खडसे अशी त्यांची नावे आहेत. या दोन महिला स्थानिकही नाहीत. रोहिणी नावाच्या ३ उमेदवारांशिवाय चंद्रकांत पाटील नावाचे २ अपक्ष उमेदवारही येथून नशीब आजमावत आहेत.
४ रोहित पाटील आणि २ संजय पाटील !
सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेत मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ गटांमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय काका पाटील (अजित पवार) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पाटील यांच्यात लढत आहे; मात्र येथे रोहित पाटील नावाच्या एकूण ३ वेगवेगळ्या उमेदवारांनीही अपक्ष आवेदन प्रविष्ट केले आहेत. याशिवाय संजय पाटील नावाच्या अपक्षानेही आवेदन प्रविष्ट केले आहे. त्यामुळे या जागेवर ४ रोहित पाटील आणि २ संजय पाटील यांच्यात अनोखी लढत पहायला मिळत आहे.
ईश्वरपूरमधील मतदारसंघावरही चुरशीची लढत !
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील (शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे निशिकांत पाटील (अजित पवार) यांच्यात लढत आहेत. शरद पवार यांचे उमेदवार जयंत यांचे पूर्ण नाव जयंत राजाराम पाटील आहे. विशेष म्हणजे येथील २ अपक्ष उमेदवारांचे पूर्ण नाव जयंत राजाराम पाटील आणि दुसर्याचे नाव जयंत रामचंद्र पाटील असे आहे. दोघेही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. निशिकांत या समान नावाचे २ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
हर्षवर्धन पाटील नावाने तिघे रिंगणात !
शरद पवार यांच्या गटाकडून हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. येथे हर्षवर्धन पाटील नावाच्या दोघांनी, तर दत्तात्रय भरणे नावाच्या आणखी एका व्यक्तीने आवेदन प्रविष्ट केले आहेत.
सातारा येथे ४ महेश शिंदे आणि २ शशिकांत शिंदे !
शिवसेनेचे महेश शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात लढत आहे. या जागेवर शशिकांत शिंदे या ३ वेगवेगळ्या उमेदवारांनी अपक्ष आवेदन प्रविष्ट केले आहे. कोरेगाव मतदारसंघातून एकूण ४ महेश शिंदे आणि २ शशिकांत शिंदे रिंगणात आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड जागेवर जोरदार लढत !
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड जागेवर जोरदार लढत आहे. भाजपने माजी मंत्री राम शिंदे यांना येथे उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून रोहित पवार रिंगणात आहेत. या ठिकाणी राम शिंदे आणि रोहित पवार नावाने २ जण अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. अशा स्थितीत रोहित पवार या नावाने ३ आणि राम शिंदे नावाचे ३ उमेदवार मैदानात आहेत.