डी.एस्. कुलकर्णी आणि त्यांच्या आस्थापनांच्या जप्त मालमत्ता मुक्त केल्या नाहीत ! – आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखा
पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डी.एस्.के.) आणि त्यांच्या विविध आस्थापनांच्या जप्त केलेल्या कोणत्याही मालमत्ता अद्याप मुक्त केल्या नसल्याची माहिती आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेने या प्रकरणातील विशेष न्यायालयास दिली आहे. आर्थिक आणि गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त महिंद्र खाडे यांनी याविषयीचा अहवाल मुंबईतील आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पी.एम्.एल्.ए.) न्यायालयात सादर केला आहे.
डी.एस्.के. यांच्या मालमत्तेबाबतची माहिती मिळण्याबाबतचा अर्ज ठेवीदारांचे अधिवक्ता चंद्रकांत बिडकर यांनी पी.एम्.एल्.ए. न्यायालयात केला होता. त्यानुसार गुन्हे शाखेने याबाबतची माहिती एका अहवालाद्वारे न्यायालयात सादर करत कोणतीही मालमत्ता मुक्त केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयी डी.एस्.के. प्रकरणातील ठेवीदारांचे अधिवक्ता चंद्रकांत बिडकर यांनी सांगितले की, या आस्थापनाने मालमत्ता घेतांना ठेवीदारांचेही पैसे वापरले आहेत. त्यामुळे ठेवीदारांना पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत डी.एस्.के. यांच्या कोणत्याच मालमत्ता मुक्त करू नयेत, असा अर्ज आम्ही केलेला आहे.