भारतात जुगारसदृश ‘जंगली रमी’ खेळणार्‍यांची संख्या ८ कोटींच्या वर !

आकर्षक बोनस देऊन तरुणांना गुंतवण्याचा प्रयत्न !

मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) – भारतात जुगारसदृश जंगली रमीची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सद्यःस्थितीत हा जुगारसदृश खेळ खेळणार्‍यांची संख्या ८ कोटींच्या वर पोचली आहे, अशी माहिती जंगली रमीच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पहिल्या ३ ठेव रकमेवर ११ सहस्र ३५० रुपयांचा आकर्षक बोनस देऊन या खेळात अधिकाधिक तरुणांना ओढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी दिवाळीच्या निमित्ताने १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत रमी खेळणार्‍यांना तब्बल ३८ कोटी रुपयांच्या बक्षिसांचे वाटप करण्यात आले आहे. यासह नियमित ऑनलाईन विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यावर लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येक रविवारी केवळ २५० रुपयांच्या प्रवेश शुल्कावर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. यासह नियमितच्या ऑनलाईन खेळात ५ लाख रुपयांपासून ते २५ लाख रुपयांपर्यंत अवाढव्य किमतीची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग या जुगारसदृश खेळाकडे आकर्षित होत असून देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे.