वाहतुकीचे नियम मोडल्याच्या प्रकरणी ९ मासांमध्ये जवळपास ७ सहस्र वाहनचालकांचा चालकपरवाना रहित
पणजी, २ नोव्हेंबर (वार्ता.) – वाहतूक खात्याने चालू वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत वाहतुकीचे विविध नियम मोडल्याच्या प्रकरणी ६ सहस्र ९८० जणांची वाहनचालक अनुज्ञप्ती (चालकपरवाना) रहित केली आहे.
वाहतूक खात्याने या अनुषंगाने पुढील माहिती दिली आहे.
१. वाहतूक ‘सिग्नल’ मोडणे – ४१४ जणांवर कारवाई, तर यामधील ३२१ जणांची अनुज्ञप्ती रहित
२. अतीवेगाने वाहन हाकणे – २ सहस्र ३२५ जणांवर कारवाई, तर यामधील ७६२ जणांची अनुज्ञप्ती रहित
३. मालवाहू वाहनातून प्रवासी नेणे – ८१ जणांवर कारवाई, तर ४९ जणांची अनुज्ञप्ती रहित
४. वाहन चालवतांना भ्रमणभाषचा वापर – ५३६ जणांवर कारवाई, तर यामधील ३७८ जणांची अनुज्ञप्ती रहित
५. अमली पदार्थांचे सेवन किंवा मद्यप्राशन करून वाहन चालवणे – ५७६ जणांवर कारवाई, तर यामधील ४१५ जणांची अनुज्ञप्ती रहित
६. दुचाकी चालवतांना शिरस्त्राण परिधान न करणे – ६ सहस्र ९०३ जणांवर कारवाई, तर ४ सहस्र ८९२ जणांची अनुज्ञप्ती रहित
७. निष्काळजीपणे वाहन हाकणे – १४ जणांवर कारवाई, तर १२ जणांची अनुज्ञप्ती रहित
८. चारचाकी वाहन चालवतांना ‘सीट बेल्ट’ न घालणे – ४ जणांवर कारवाई, चौघांचीही अनुज्ञप्ती रहित
९. दुचाकीवरून ३ जणांनी प्रवास करणे – १८६ जणांवर कारवाई, तर यामधील १३८ जणांची अनुज्ञप्ती रहित
एकंदरीत ११ सहस्र ३९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर ६ सहस्र ९८० जणांची वाहनचालक अनुज्ञप्ती रहित करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेण्यासंबंधी एकही प्रकरण नोंद झालेले नाही. पोलिसांकडे अजूनही सुमारे ३० सहस्र वाहनचालकांनी वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याची सूची उपलब्ध आहे.