गोव्यातील दूधसागर पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर कुळे येथे तणावपूर्ण स्थिती !
मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुन्हा ‘टूर ऑपरेटरना’ भेटणार
(टूर ऑपरेटर म्हणजे प्रवासाचे नियोजन करणारे)
फोंडा, २ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधबा पर्यटन हंगामाला २ नोव्हेंंबर या दिवशी तणावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे तिकीट विक्रीकेंद्र बंद करावे आणि धबधब्यावर जाण्यासाठी असलेली ‘ऑनलाईन बुकींग’ सुविधा महामंडळाने कुळे येथील ‘टूर ऑपरेटर्स’ संघटनेकडे सुपुर्द करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. या मागणीवरून महामंडळ आणि ‘टूर ऑपरेटर्स’ यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे.
कुळे येथील ‘टूर ऑपरेटर्स’ संघटनेने त्यांच्या मागण्यांवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत यापूर्वी अनेक बैठका घेऊन याविषयी चर्चा केली; मात्र यावर तोडगा निघू शकला नव्हता. संघटनेने २ नोव्हेंबरपासून उपोषणाला प्रारंभ केला आहे. यामुळे ज्या ठिकाणी दूधसागर धबधब्यावर जाण्याच्या प्रवासाला प्रारंभ होतो, त्या ठिकाणी २ नोव्हेंबर या दिवशी सकाळपासून तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कडेकोट पोलीस बंदोबस्तात काही जीपगाड्या धबधब्यावर सोडण्यात आल्या, तर काही जीपगाड्यांना स्थानिकांनी वाटेवर अडवले. या वेळी घटनास्थळी उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर आणि अन्य अधिकारी आले; मात्र संघटनेच्या पदाधिकार्यांनी ‘ऑनलाईन बुकींग’ सुविधा ‘टूर ऑपरेटर्स’ संघटनेकडे सुपुर्द करीपर्यंत हंगाम चालू होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. कुळे येथे निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीची माहिती मिळताच राज्यसभेचे माजी खासदार विनय तेंडुलकर, सावर्डे मतदारसंघाचे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई आदींनी घटनास्थळी धाव घेऊन ‘टूर ऑपरेटर्स’ संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली आणि आजच्या दिवशी धबधब्यावर जीपगाड्या सोडण्यास अनुमती दिली. ‘टूर ऑपरेटर्स’ संघटनेने चालू केलेल्या आंदोलनाला खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर आणि सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे.