‘सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असलेली विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणारा परिणाम’, या संदर्भातील संशोधन !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘देवळे, तीर्थक्षेत्रे, संतांचे मठ किंवा आश्रम इत्यादी ठिकाणी भाविकांना लावण्यासाठी विभूती ठेवली जाते, तसेच विविध धार्मिक विधींच्या वेळी केले जाणारे होमहवन, यज्ञयाग यांची विभूती कपाळावर लावली जाते. घरात आपण प्रतिदिन भक्तीभावाने देवांची पूजा करतांना उद्बत्ती, धूप इत्यादी दाखवतो. त्या वेळची विभूती आपण कपाळावर लावतो. विभूती लावल्यावर सर्वांना चांगले वाटते, तर काहींना चांगल्या अनुभूतीही येतात.
सध्याचे वातावरण अत्यंत रज-तमप्रधान बनले आहे. या वाढलेल्या रज-तमप्रधान स्पंदनांचा नकारात्मक परिणाम वस्तू, वास्तू, व्यक्ती इत्यादींवर अल्प-अधिक प्रमाणात होत असतो. हे आपण दैनंदिन जीवनात अनुभवतो. सकाळी देवपूजा करतांनाची विभूती दिवसभर उघड्यावर राहिल्यास तिच्यावर त्रासदायक स्पंदनांचे आवरण येण्याची शक्यता असते.
आपण देवळात जातो, तेव्हा काही वेळा तेथील थोडी विभूती कागदात बांधून समवेत घरी घेऊन येतो. घरी आल्यावर ही विभूती लगेच डबीत बंद करून सात्त्विक ठिकाणी, उदा. देवघरात ठेवावी, तसेच विभूती शक्यतो वेळेत वापरून संपवावी. काही वेळा आपण एखादी विभूती अनेक दिवस तशीच ठेवून देतो आणि नंतर विसर पडल्याने ती वापरली जात नाही. कालांतराने आठवण झाल्यावर आपण ती वापरतो; पण तसे करतांना ‘विभूतीतील चैतन्य टिकून आहे का ?’, याचा विचार सहसा कुणी करत नाही. विभूतीच्या संदर्भातील एक संशोधन पुढे दिले आहे.
‘सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असलेली विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो आणि तो किती काळ टिकतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. (भाग १)
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. ( Find UTS Image ) |
१. चाचणीतील विभूतींच्या नोंदी
या चाचणीत ३ प्रकारच्या विभूतींच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. पुढे दिलेल्या नोंदींतून लक्षात येते की, ‘विभूती क्र. १’ मध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा आहे. ‘विभूती क्र. २’ मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारच्या ऊर्जा आहेत. ‘विभूती क्र. ३’ मध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सकारात्मक ऊर्जा आहे.
‘या तीनही प्रकारच्या विभूती आज्ञाचक्रावर लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी काही संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगात पुढील ५ साधक सहभागी होते.
अ. तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप १) असलेली व्यक्ती
आ. आध्यात्मिक त्रास नसलेली व्यक्ती
इ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळीची (टीप २) व्यक्ती
ई. आध्यात्मिक त्रास नसलेली अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळीची व्यक्ती
उ. ‘सनातनचे दुसरे बालसंत’ पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे)
टीप १ – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
टीप २ – आध्यात्मिक पातळी : प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण असतात. व्यक्तीने साधना, म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न आरंभ केल्यावर तिच्यामधील रज-तम गुणांचे प्रमाण घटू लागते आणि सत्त्वगुणाचे प्रमाण वाढू लागते. सत्त्वगुणाच्या प्रमाणावर आध्यात्मिक पातळी (स्तर) अवलंबून असते. सत्त्वगुणाचे प्रमाण जितके जास्त, तितकी आध्यात्मिक पातळी जास्त असते. सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. साधना करून ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या व्यक्तीला महर्लोकात स्थान मिळते. ६० टक्के आणि त्यापुढील आध्यात्मिक पातळी गाठलेल्या व्यक्तीला मृत्यूनंतर पुनर्जन्म नसतो. अशी व्यक्ती पुढील साधनेसाठी किंवा मानवजातीच्या कल्याणार्थ स्वेच्छेने पृथ्वीवर जन्म घेऊ शकते. ७० टक्के आध्यात्मिक पातळीची व्यक्ती संत (गुरु) गणली जाते. तिला देहत्यागानंतर जनलोक प्राप्त होतो. ८० टक्के आध्यात्मिक पातळीची व्यक्ती सद्गुरु आणि ९० टक्केहून अधिक आध्यात्मिक पातळीची व्यक्ती परात्पर गुरु गणली जाते. त्यांना देहत्यागानंतर अनुक्रमे तप आणि सत्य लोक प्राप्त होतो. मोक्षाला गेलेल्या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी १०० टक्के असते आणि तेव्हा ती त्रिगुणातीत होते. |
निर्जीव वस्तू म्हणजे १ टक्का आणि ईश्वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी, असे गृहित धरून त्या तुलनेत व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार तिची वर्तमान आध्यात्मिक पातळी निश्चित करता येते. एका संतांना समष्टी कार्याच्या आवश्यकतेनुसार साधकांच्या आध्यात्मिक पातळीविषयी ध्यानातून उत्तरे मिळतात. त्याविषयीचे लिखाण ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येते.
२. संशोधनात्मक प्रयोगांतील ४ व्यक्ती आणि १ बालसंत यांच्या नोंदी
पहिल्या प्रयोगात सर्वांना आज्ञाचक्रावर (दोन भुवयांच्या मध्ये) लावण्यासाठी ‘विभूती क्र. १’ देण्यात आली. त्यानंतर दुसर्या आणि तिसर्या प्रयोगात त्यांना अनुक्रमे ‘विभूती क्र. २’ अन् ‘विभूती क्र. ३’ आज्ञाचक्रावर लावण्यासाठी देण्यात आल्या. प्रत्येक प्रयोगात ‘विभूती लावण्यापूर्वी’, ‘विभूती लावल्यावर लगेच’, ‘विभूती लावून १५ मिनिटे झाल्यावर’ आणि ‘विभूती लावून १ घंटा झाल्यावर’ अशा एकूण ४ टप्प्यांत सर्वांची छायाचित्रे काढून ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदींचे विवेचन पुढे दिले आहे.
२ अ. ‘विभूती क्र. १’ (नकारात्मक स्पंदने असलेली विभूती) लावल्याचा सर्वांवर नकारात्मक परिणाम होणे आणि तो अनुमाने १ घंटा टिकून रहाणे
वरील नोंदींच्या तुलनात्मक अभ्यासातून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. विभूती लावल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली. विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी तिच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली.
२. विभूती लावल्यानंतर अन्य ३ व्यक्तींतील नकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा घटली. विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी तिघांतील नकारात्मक ऊर्जा आणखीन वाढली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.
३. विभूती लावल्यानंतर बालसंतांमधील नकारात्मक ऊर्जेत अत्यल्प प्रमाणात वाढ झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ घटली. विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणखीन घटली.
४. सर्वांवर विभूतीचा नकारात्मक परिणाम विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी पूर्णपणे दिसून आला.
५. या विभूतीचा नकारात्मक परिणाम सर्वांवर अनुमाने १ घंटा टिकला.
३. निष्कर्ष
नकारात्मक स्पंदने असलेली विभूती लावल्याने सर्वांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर नकारात्मक परिणाम झाले आणि ते अनुमाने १ घंटा टिकून राहिले. यातून विभूतीमध्ये नकारात्मक (त्रासदायक) स्पंदने असतील, तर व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होण्याऐवजी हानी होते, हे लक्षात येते.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.९.२०२४)
इ-मेल : mav.research2014@gmail.com
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |