Chhattisgarh HC : पतीच्या हिंदु धर्माची खिल्ली उडवणार्या ख्रिस्ती पत्नीला घटस्फोट देणे योग्यच ! – छत्तीसगड उच्च न्यायालय
छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय !
रायपूर (छत्तीसगड) – जर पत्नीने पतीच्या धार्मिक श्रद्धांची खिल्ली उडवली, तर पतीला घटस्फोट देण्याचा अधिकार आहे, असे सांगत छत्तीसगड उच्च न्यायालयाने ख्रिस्ती पत्नीपासून हिंदु पतीला घटस्फोट देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या वेळी पत्नीने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात केलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळले.
सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्या पत्नीने स्वत: मान्य केले की, तिने गेल्या १० वर्षांपासून कोणत्याही हिंदु धार्मिक विधीमध्ये भाग घेतला नाही. पूजा करण्याऐवजी ती चर्चमध्ये जाऊ लागली. हे वेगवेगळ्या धर्मातील २ लोकांमधील लग्नाचे प्रकरण नाही. येथे धार्मिक प्रथांमध्ये परस्पर समंजसपणा अपेक्षित आहे. या प्रकरणात पतीने सांगितले की, ‘पत्नी वारंवार त्याच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान करते. तिने अनेक वेळा त्याच्या देवतांचा अपमान केला आहे.’ पत्नीकडून ‘सहधर्मिनी’ म्हणून वागणे अपेक्षित आहे, तसे न होणे, हे एका धर्माभिमानी पतीवर मानसिक क्रौर्य आहे. अशा परिस्थितीत पतीला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. केवळ महाभारत आणि रामायण यांमध्येच नाही, तर मनुस्मृतीतही असे म्हटले आहे की, ‘कोणताही यज्ञ पत्नीखेरीज अपूर्ण आहे. धार्मिक कार्यात पत्नी पतीच्या बरोबरीची भागीदार असते.’ पती त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. अशा परिस्थितीत त्याला कुटुंबातील सदस्यांसाठी धार्मिक विधी करावे लागतात.
काय आहे प्रकरण ?
मध्यप्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील करंजिया येथे रहाणारी नेहा हिने ७ फेब्रुवारी २०१६ या दिवशी छत्तीसगडच्या बिलासपूर येथील विकास चंद्रा याच्यासमवेत हिंदु रितीरिवाजांनुसार विवाह केला. विकास देहलीत नोकरी करायचा. नेहा काही दिवस पती विकाससमवेत देहलीत राहिली. त्यानंतर ती बिलासपूरला परतली. या काळात नेहाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि ती चर्चमध्ये जाऊ लागली. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर नेहाने हिंदु धार्मिक श्रद्धा आणि देवता यांची खिल्ली उडवण्यास चालू केले. विकासने नेहाला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला; पण तिने खिल्ली उडवणे थांबवण्याचे मान्य केले नाही. अंतत: पत्नीच्या या वागण्याने नाराज होऊन विकासने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सुनावणीनंतर कौटुंबिक न्यायालयाने विकासच्या बाजूने निकाल दिला. या निकालाला नेहाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्मीय कधीही अन्य धर्मियांच्या श्रद्धांची खिल्ली उडवत नाहीत; मात्र अन्य धर्मीय विशेषतः ख्रिस्ती आणि ख्रिस्ती मिशनरी हिंदूंच्या श्रद्धांची खिल्ली उडवतांना दिसतात. अशांवर कारवाई होत नसल्याने ते उद्दाम झाले आहेत. अशांना योग्य शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी केंद्र आणि राज्य सरकारांवर दबाव आणणे आवश्यक आहे ! |