Mumbai HC On Animal Trafficking : प्राण्यांच्या तस्करीच्या प्रकरणांत भविष्यात खरेदी पावत्या आणि विक्रेता यांची सत्यता पडताळण्यात यावी !
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल !
मुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) – वर्धा आणि यवतमाळ येथून म्हशींची तस्करी केल्याच्या २ वेगवेगळ्या घटनांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अनुक्रमे अकबर भुराभाई सिंधी अन् अब्दुल समद यांना दोषी ठरवले आहे. म्हशींना घरी नेत असल्याचे सांगून हे दोघेही म्हशींची मांसासाठी तस्करी करत असल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले. या दोन्ही प्रकरणांमध्ये म्हशींना खरेदी केल्याच्या बनावट पावत्या दाखवण्यात आल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. असे प्रकार लक्षात घेऊन न्यायालयाने भविष्यात प्राण्यांच्या तस्करीच्या प्रकरणांमध्ये पावत्या खात्रीशीर आहेत का ? विक्री करणार्या शेतकर्यांचा जबाब, तसेच प्राणी खरेदी केलेल्या बाजाराची वैधता यांची सत्यता पडताळण्याचे निर्देश दिले आहेत.
सप्टेंबर २०२३ मध्ये यवतमाळ येथे अब्दुल समद याला गाडीतून १७ म्हशी नेत असतांना पोलिसांनी अटक केले, तर एप्रिल २०२४ मध्ये वर्धा येथे गाडीतून १६ म्हशी नेत असतांना अकबर भुराभाई सिंधी याला पोलिसांनी अटक केले. या दोन्ही प्रकरणांमध्ये म्हशींना गाडीमध्ये निर्दयीपणे कोंबण्यात आले होते. दोन्ही प्रकरणांत स्वत:च्या घरी नेण्यासाठी शेतकर्यांकडून म्हशी विकत घेतल्याचे सांगण्यात आले होते. दंडाधिकारी आणि सत्र न्यायालय यांनी दोन्ही प्रकरणांतील आरोपी अब्दुल आणि अकबर यांना दोषी ठरवले. या निर्णयाच्या विरोधात दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. दोन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठामध्ये नुकतीच पार पडली. यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांचा निर्णय कायम ठेवला. शासनाच्या वतीने अधिवक्ता राजू गुप्ता आणि अधिवक्त्या एस्.व्ही. कोल्हे यांनी न्यायालयात बाजू मांडली. या दोन्ही प्रकरणांमध्ये अब्दुल आणि अकबर यांनी बनावट पावत्या सिद्ध करून, तसेच शेतकर्यांकडून स्वत:च्या घरी घेऊन जाण्यासाठी म्हशी विकत घेतल्याचे सांगून पोलिसांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले.
भविष्यात प्राण्यांची तस्करी रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निकाल ! – अधिवक्ता राजू गुप्ता
प्राण्यांच्या वाहतुकीच्या अनेक प्रसंगांमध्ये सादर करण्यात येणार्या पावत्या पोलिसांकडून ‘सत्य’ मानल्या जातात. न्यायालयांमध्येही त्यांची पडताळणी न झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशा प्रसंगांची वारंवारता लक्षात घेऊन भविष्यात बनावट पावत्या आणि खोट्या व्यवहाराचे पुरावे देऊन प्राण्यांची तस्कारी होऊ नये, या दृष्टीने न्यायालयाचा हा निकाल महत्त्वपूर्ण आहे. भविष्यात प्राण्यांची तस्करी रोखण्याच्या दृष्टीने या खटल्यामध्ये न्यायालयाने दिलेले निर्देश महत्त्वपूर्ण ठरतील, असे मत या खटल्यात शासनाच्या वतीने बाजू मांडणारे अधिवक्ता राजू गुप्ता यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले.
संपादकीय भूमिका
|