Donald Trump On Bangladeshi Hindus : राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि कमला हॅरिस यांनी जगात अन् अमेरिकेत हिंदूंची उपेक्षा केली ! – ट्रम्प यांचा आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचा निषेध

अमेरिकेच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (डावीकडे) राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि कमला हॅरिस (उजवीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – बांगलादेशातील हिंदु, ख्रिस्ती आणि इतर अल्पसंख्यांक यांच्यावरील रानटी हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करतो. या सर्वांवर जमावाने आक्रमणे केली आणि त्यांना लुटले. ते लोक पूर्ण अराजकतेच्या स्थितीत आहेत. माझ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात असे कधीच घडले नाही. राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी जगात अन् अमेरिकेत हिंदूंची उपेक्षा केली आहे. ते इस्रायलपासून युक्रेनपर्यंत आणि आपल्या स्वत:च्या दक्षिण सीमेपर्यंत लोकांना आपत्तीत आणत आहेत, असा आरोप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील हिंदूंना दिवाळीनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशासमवेतच वरील आरोप केले. बांगलादेशाच्या सूत्रावर ट्रम्प यांनी मत व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अमेरिकेत ५ नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची थेट लढत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्याशी आहे.

१. ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहेे की, आम्ही अमेरिकेला पुन्हा भक्कम बनवू आणि शांतता प्रस्थापित करू. कट्टरपंथी डाव्यांच्या धर्मविरोधी धोरणांविरुद्धही आम्ही हिंदू अमेरिकी लोकांचे रक्षण करू. आम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढू.

२. भारतासमवेतच्या संबंधांविषयी ट्रम्प यांनी म्हटले की, माझ्या प्रशासनात आम्ही भारत आणि माझे चांगले मित्र पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेली मोठी भागीदारी भक्कम करू.

३. कमला हॅरिस अधिक नियम आणि अधिक कर लावून तुमचे छोटे व्यवसाय नष्ट करतील. याउलट, मी कर कमी केले, नियमात कपात केली, अमेरिकी ऊर्जाव्यवस्थेतील जटिलता अल्प केली आणि इतिहासातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था निर्माण केली. आम्ही ते पुन्हा करू, पूर्वीपेक्षा मोठे आणि चांगले. आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू.

४. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी लिहिले की, तसेच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. मला आशा आहे की, दिव्यांच्या उत्सवामुळे वाईटावर चांगल्याचा विजय होईल !

संपादकीय भूमिका

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत असून ट्रम्प हे उमेदवार आहेत आणि त्यांना अमेरिकेतील हिंदूंची मते घ्यायची असल्याने ते असे आता म्हणत आहेत. कमला हॅरिस भारतीय वंशाच्या हिंदू असूनही त्यांनी कधी हिंदूंवरील अत्याचारांवर विधान केले नसल्याने ट्रम्प हिंदूंना अधिक जवळचे वाटल्यास आश्‍चर्य वाटू नये !