बंडखोरी केलेल्या उमेदवारांना परत पक्षात घेणार ! – फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुंबई – काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. एकमेकांच्या उमेदवारांविरोधात अर्ज भरण्यात आले आहेत. ज्यांनी तिकीट नसतांना उमेदवारी भरलीय त्यांना पक्षात परत घेण्याचा प्रयत्न तिन्ही पक्ष मिळून करणार आहेत. पक्षांतर्गतही काही उमेदवार उभे राहिले आहेत. त्यांनाही विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना परत घेण्याचा प्रयत्न असेल, असे  देवेंद्र फडणवीस म्हणाले. काँग्रेसचे नेते आणि मुंबई महापालिकेचे  माजी स्थायी समिती अध्यक्ष रवी राजा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते.

बोरीवलीतून गोपाळ शेट्टींसह मुंबई आणि ठाण्यातील अनेक जुने कार्यकर्ते अप्रसन्न झाले आहेत. त्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, गोपाळ शेट्टी हे भाजपचे अतिशय प्रामाणिक सैनिक राहिले आहेत. ते अनेक वेळा आग्रही असतात. शेवटी ते पक्षशिस्त मान्य करतात. त्यांना परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. भाजपच्या पाठी उभे रहाण्याची भूमिका ते कायम घेतात, तशीच भूमिका ते आताही घेतील.

उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून अपेक्षित सर्व अर्ज वैध ठरले आहेत. दिवाळीनंतर जोराने प्रचार चालू होईल. भाजपमध्ये येत्या काही दिवसांत मोठे पक्षप्रवेश होतील. तिन्ही पक्षांतील अर्जाच्या अडचणी सोडवल्या आहेत, असेही ते या वेळी म्हणाले.