दिंडोरी (जिल्हा नाशिक) येथील रामशेज गड १०१ टेंभे, २१ मशाली आणि १००१ दिव्यांनी उजळला !

‘सकल मराठा परिवारा’द्वारे ‘एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी’ उपक्रम !

रामशेज गड

दिंडोरी (जिल्हा नाशिक) – सकल मराठा परिवाराच्या वतीने ‘एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी’ हा उपक्रम राबवत रामशेज गडावर २१ मशाली, १०१ टेंभे आणि १००१ दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. रामशेज येथे १०१ टेंभे, २१ मशाली आणि १ सहस्र १ दिवे लावून छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज अन् स्वराज्यासाठी देह ठेवणार्‍या लाखो मावळ्यांच्या स्मरणार्थ दिवा लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी ३.४५ वाजता गडाच्या पायथ्याशी शिवप्रेमी जमले आणि त्यानंतर गडावर चढाईस प्रारंभ झाला.

गडावर गेल्यावर प्रथम गडाची स्वच्छता करण्यात आली. नंतर रांगोळी काढण्यात आली. गडावरील झेंड्याच्या ठिकाणी ध्वजपूजन आणि गडपूजन करण्यात आले. महाद्वाराला तोरण बांधून पूजा केली. गडावरील छत्रपती शिवराय यांच्या मूर्तीची महिला भगिनी आणि शिवप्रेमी यांच्याकडून पूजा करून पुष्पवृष्टी करण्यात आली. सर्वत्र दिवे लावून आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या वेळी शिवचरित्रकार साक्षी ढगे यांचे ‘शिव’व्याख्यान झाले. या वेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.