५० लाख रुपये उत्पन्न असलेले उमेदवार युगेंद्र पवार यांची मालमत्ता ५ वर्षांत ५० कोटी !

युगेंद्र पवार

पुणे – बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांचे उत्पन्न वर्ष २०१९-२० मध्ये ४९ लाख ८१ सहस्र रुपये म्हणजे जवळपास ५० लाख असल्याचे त्यांनी स्वत:च्या उमेदवारी अर्जासमवेत प्रविष्ट केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यापुढील ५ वर्षांत त्यांची मालमत्ता ५० कोटी रुपये किमतीची असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासमवेत प्रविष्ट केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. (सर्वसामान्याला लाखाचे कोटी करण्यात संपूर्ण आयुष्य वेचावे लागते; पण राजकारणात लाखाचे कोटीत जायला काही दिवसांचा कालावधीही पुरेसा असतो, हे या उदाहरणांवरून लक्षात येते. हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे ! – संपादक) विशेष म्हणजे युगेंद्र यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांचीही मालमत्ता ५० कोटी रुपये नाही. त्यांची मालमत्ता ३८ कोटी रुपये आहे, तर शरद पवार यांची मालमत्ता ३२ कोटी रुपये असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

युगेंद्र यांची मालमत्ता !

यात जंगम मालमत्ता ३९.७९ कोटी इतक्या किमतीची असून अचल मालमत्ता १०.७९ कोटी रुपये आहे. बँकेतील ठेवी आणि सहकारी संस्थांमधील ठेवी २.९३ कोटी रुपये असून विविध बॉण्ड, शेअर्समध्ये ३१.८२ कोटी रुपये, १.०७ कोटी रुपये किमतीच्या गाड्या आहेत. अचल संपत्तीत मुळशी आणि बारामती तालुक्यांत काही प्लॉट्स असून मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत नेपियन सी रोड येथे २ सहस्र ५० चौ. फुटांची एक सदनिका आहे.

राज्यात १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त !

सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी, फिरती तपासणी पथके, स्थिर तपासणी पथके उभारून वाहनांची पडताळणी चालू आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध पथकांद्वारे १५ ते ३० ऑक्टोबर या समयमर्यादेत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये रोख रक्कम, अमली पदार्थ, अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. (पैसे वाटून किंवा विविध आमिषे दाखवून निवडणुका जिंकणार्‍या नेत्यांच्या हातात सत्ता गेल्यास काय अवस्था होते ? हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही ! पैसे वाटून मते घेऊन निवडून येणारे उमेदवार कधी विधायक कार्य करू शकतील का ? – संपादक)