दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : निवडणुकीसाठी भरलेले ९२१ अर्ज अवैध !; निवडणुकीसाठी ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी !…
निवडणुकीसाठी भरलेले ९२१ अर्ज अवैध !
मुंबई – महाराष्ट्राच्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांतून तब्बल ७ सहस्र ९९४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते. त्यांच्या पडताळणीमध्ये ७ सहस्र ७३ अर्ज वैध ठरले असून ९२१ अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. ४ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे.
निवडणुकीसाठी ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी !
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ सहस्र ११९ मतदारांनी नोंणी केली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ५ कोटी २२ सहस्र ७३९, महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६९ लाख ९६ सहस्र २७९, तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ६ सहस्र १०१ इतकी आहे. पुणे ८८ लाख ४९ सहस्र ५९० ही सर्वांत अधिक मतदार नोंदणी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांत अल्प ६ लाख ७८ सहस्र ९२८ मतदारांची नोंदणी झाली आहे. वयाची १०० वर्षे पार झालेले ४७ सहस्र ३८९ मतदार राज्यात आहेत.
काँग्रेसचे मुंबईतील नेते रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश !
मुंबई – मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून पद भूषवलेले काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन याविषयी रवी राजा यांनी भाजपप्रवेशाची माहिती दिली. रवी राजा यांनी विधासभेच्या निवडणुकीत शीव कोळीवाडा येथून उमेदवारी मागितली होती; मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे रवी राजा यांच्यात असंतोष होता. रवी राजा यांच्या भाजपप्रवेशामुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.
भाजपचे नाही, तर महायुतीचे सरकार येणार ! – फडणवीस
मुंबई – काँग्रेस नेते रवी राजा यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख ‘मुख्यमंत्री’ असा केला. त्या वेळी फडणवीस म्हणाले की, त्यांच्या शुभेच्छा नम्रपणे स्वीकारतो; पण महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नसून महायुतीचे सरकार येणार आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री असेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
माहीम मतदारसंघाविषयी बैठक घेऊन प्रश्न सोडवू ! – फडणवीस
मुंबई – सदा सरवणकर यांनी माहीम मतदारसंघात अपक्ष अर्ज भरल्याने यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे, मी, आशिष शेलारांसह आज बैठक होणार आहे. आमचा प्रयत्न आहे की, यातून मार्ग असा निघावा ज्यातून आम्ही सगळे एकत्र राहू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माहीम मतदारसंघाविषयी दिली.