साधकांच्या मनातील प्रश्न अंतर्ज्ञानाने ओळखून त्यांची उत्तरे देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘गुरुदेवांना ‘जिज्ञासू आणि साधक यांच्या मनात कोणते प्रश्न आहेत ?’, हे अंतर्ज्ञानाने समजते अन् त्यानुरूप ते असे प्रश्न त्यांची सूक्ष्मातून उत्तरे मिळवण्यासाठी मला तत्परतेने पाठवतात. या प्रश्नांची सूक्ष्मातून मिळालेली उत्तरे परात्पर गुरु डॉ. आठवले पडताळतात. त्यानंतर ते हे ज्ञान दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होते. ‘गुरुदेवांना अंतर्ज्ञानाने साधकांच्या मनातील प्रश्न समजतात’, याविषयीची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. वर्ष २०२० मध्ये गुरुदेवांनी मला ब्रह्मांडातील विविध पृथ्वींविषयीचा प्रश्न दिला होता. याविषयी मला सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त झाले. हे ज्ञान वाचून गुरुदेवांनी ‘हा विषय सुस्पष्ट व्हावा’, यासाठी मला आणखी एकूण ३५ उपप्रश्न विचारले. या धारिकेतील प्रश्नोत्तरे पूर्ण होण्यासाठी मला १ मास लागला होता. ज्या दिवशी हा विषय पूर्ण झाला, त्याच्या दुसर्या दिवशी बाहेरगावाहून रामनाथी आश्रमात आलेला एक साधक मला भेटला. त्याने मला विचारले, ‘‘ब्रह्माडांतील विविध पृथ्वींविषयी तुम्हाला काही ज्ञान मिळाले आहे का ? ते जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.’’ हे ऐकून मला आश्चर्य वाटले; कारण कालच हा विषय पूर्ण झाला होता. मी त्या साधकाला धारिकेतील विषय थोडक्यात सांगितला. तो ऐकून त्याचे समाधान झाले.
२. ऑगस्ट २०२४ मध्ये गुरुदेवांनी सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्यासाठी पुढील प्रश्न दिला होता – ‘संत विशिष्ट कारणांसाठी साधकांना प्रतिदिन विशिष्ट कालावधीसाठी नामजप करण्यास सांगतात. ‘संतांचे आज्ञापालन म्हणून त्यांनी जितका काळ साधकाला नामजप करण्यास सांगितला आहे, तितकाच करावा. साधकाने स्वतःच्या मनाने तो कालावधी अल्प-अधिक करू नये; कारण त्या कालावधीसाठी संतांचा संकल्प झालेला असतो’, असे सांगितले जाते; पण काही वेळा साधक संतांनी सांगितलेला नामजप करतांना ‘या कालावधीत मनात इतर विचार आले किंवा नामजप भावपूर्ण झाला नाही’, या विचाराने तो वेळ भरून काढण्यासाठी अधिक वेळ नामजप करतात. असे करणे योग्य आहे कि अयोग्य ? यामध्ये लाभ आणि हानी कशा प्रकारे होते ?’
वरील प्रश्नाचे उत्तर मला सूक्ष्मातून प्राप्त झाले. हे उत्तर गुरुदेवांनी पडताळले. त्यानंतर काही दिवसांतच मला पुढील अनुभव आले.
अ. सौ. अवंतिका दिघे यांनी मला विचारले, ‘‘सध्या ज्ञानाचा कोणता विषय चालू आहे ?’’ मी त्यांना वरील विषय सांगितला. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘आश्चर्य आहे ! माझ्या मनात हाच प्रश्न होता. मला त्याचे उत्तर मिळाले.’’
आ. त्यानंतर २ दिवसांनी सौ. मधुरा कर्वे मला म्हणाल्या, ‘‘ज्ञानाचा नवीन विषय सांगा !’’ मी त्यांना वरील प्रश्नोत्तरे सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होते.’’
इ. वरील २ प्रसंग मी अनुभूती म्हणून श्री. सोमनाथ मल्ल्या यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘बरे झाले, मला सांगितले. आज दुपारी नामजपादी उपाय करत असतांना माझा जप नीट होत नव्हता. त्यामुळे आणखी काही वेळ जप करण्याचा विचार माझ्या मनात आला होता; पण ‘तसे करणे योग्य कि अयोग्य ?’, हे मला समजत नव्हते. आता त्याचे उत्तर मिळाले.’’
समाजात शिष्य गुरूंना काही प्रश्न विचारतात आणि गुरु त्यांची उत्तरे देतात, याउलट परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या मनातील प्रश्न अंतर्ज्ञानाने ओळखून त्यांची उत्तरे देण्याची वरीलप्रकारे व्यवस्था करतात. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे कार्य अद़्भुत आणि अलौकिक आहे’, हे वरील उदाहरणांवरून लक्षात येते.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.९.२०२४)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |