Russia Fines Google : रशियामध्ये यू ट्यूब चॅनल्स बंद केल्यावरून गूगलला अडीच डेसिलियन डॉलर्सचा दंड !
रशियात गूगल आस्थापन दिवाळखोर घोषित !
(एक अब्ज (बिलियन) म्हणजे एकावर ९ शून्य, तर डेसिलियन म्हणजे एकावर ३३ शून्य)
मॉस्को (रशिया) : ‘गूगल’ आस्थापनाने वर्ष २०२० मध्ये रशियाचे समर्थन करणार्या १७ यू ट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली होती. या विरोधात या चॅनल्सनी न्यायालयात खटला प्रविष्ट (दाखल) केला होता. वर्ष २०२० मध्ये सुनावणी करतांना रशियातील न्यायालयाने चॅनल्सवरील बंदी उठेपर्यंत प्रतिदिन १ लाख रूबल (रशियाचे चलन) म्हणजे ८४ सहस्र रुपये दंड ठोठावला होता. तो भरण्यासाठी ९ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत गूगलने दंड न भरल्यास प्रत्येक २४ तासांनी तो दुप्पट होईल, असेही न्यायालयाने म्हटले होता. आता हा दंड अडीच डेसिलियन डॉलर्सवर पोचला आहे. ही रक्कम संपूर्ण जगाच्या सकल उत्पन्नाच्या (जीडीपीच्या) ६२० पट अधिक आहे. याचा अर्थ जगातील सर्व देशांच्या जीडीपीमध्ये ६२० पट वाढ केली, तरच ही रक्कम जमा होईल.
वर्ष २०२२ मध्ये गूगलला रशियामध्ये दिवाळखोर घोषित करण्यात आले होते; परंतु गूगलचे सर्च इंजिन आणि यू ट्यूब यांसारख्या सेवा अजूनही रशियामध्ये उपलब्ध आहेत. रशियाने ‘एक्स’ आणि ‘फेसबुक’ या सामाजिक माध्यमांवर बंदी घातली आहे; मात्र गूगलवर अद्याप ही बंदी घालण्यात आलेली नाही. गूगलने मात्र रशियातील सेवा अल्प केली आहे.
गेल्या १० वर्षांत वेगवेगळ्या देशांनी गूगलवर एकूण १४ अब्ज डॉलर्सचा (११ सहस्र ६२० कोटी रुपयांचा) दंड ठोठावला आहे. २१ ऑक्टोबर २०२२ या दिवशी भारताने गूगलला अनुचित व्यवसायाच्या प्रकरणी १ सहस्र ३३८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
ब्रिटनमध्येही गूगलवर डिजिटल विज्ञापनांच्या बाजारपेठेचा अपलाभ घेतल्याचा आरोप आहे.