आंबेगाव बुद्रुक (पुणे) येथील शिवसृष्टी येथे ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला !
पुणे – धनत्रयोदशीच्या दिवशी पहाटे मुंबई येथील सईशा प्रॉडक्शन्सने आंबेगाव बुद्रुक येथील ‘शिवसृष्टी’ या आशियातील सर्वांत भव्य ऐतिहासिक ‘थीम पार्क’मध्ये (एकाच विषयाच्या भोवती गुंफलेल्या कार्याच्या ठिकाणामध्ये) ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ उत्साहात सादर केला. या कार्यक्रमात धगधगती गीते आणि प्रभावी निवेदनाच्या माध्यमातून पुणेकर रसिकांना छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि गौरवशाली कालखंडाची यशोगाथा नव्या स्वरूपात अनुभवता आली. पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’द्वारे ही ‘शिवसृष्टी’ साकारली जात आहे.
या कार्यक्रमाला लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, सुप्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर, सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे तळबीड येथील वंशज विक्रमसिंह बाजी मोहिते, हिरोजी इंदळकर यांचे जेजुरी येथील वंशज संतोषदादा इंदळकर, ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त अमृत पुरंदरे, विनीत कुबेर, महासचिव अजित आपटे, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी मान्यवरांसह इतिहासप्रेमी आणि आंबेगावमधील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र घराघरांत आणि प्रत्येक व्यक्तीच्या नसानसांत पोचावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ४३ गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांसमोर गौरवशाली इतिहास उभा राहिला. या कार्यक्रमामध्ये नचिकेत देसाई, श्रीरंग भावे, केतकी भावे-जोशी, अनिल नलावडे या गायक कलाकारांनी मंत्रमुग्ध करणार्या गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, गीत आणि संगीत हे अनिल नलावडे यांचे होते. पद्मश्री राव यांनी दिग्दर्शन, सूत्रसंचालन, संकलन आणि निवेदन केले.