कार्तिकी यात्रेच्या निमित्त पंढरपूर शहरात वाहतूक मार्गात पालट !
सोलापूर – श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ६ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकी यात्रा भरणार आहे. यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहर आणि पंढरपूर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर पंढरपूर शहरात प्रवेश करणारी वाहने, शहरातून बाहेर जाणारी वाहतूक या संदर्भात वाहनतळ व्यवस्था, एकेरी मार्ग यांमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाहतूक मार्गात पालट केले आहेत.
अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर मोहोळकडून येणारी सर्व वाहने करकंब क्रॉस रोड (अहिल्यादेवी चौक) तीन रस्ता मार्गे विसावा येथे थांबतील. ६५ एकर येथे केवळ दिंडी आणि पालखी यांची वाहने थांबतील. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे थांबतील. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोलामार्गे येणारी वाहने कासेगाव फाटा मार्गे बिडारी बंगला आणि यमाई-तुकाई मंदिर मैदान किंवा वेअर हाऊस मध्ये थांबतील. पुणे, सातारा येथे जाणार्या सर्व गाड्या सरगम चौक, कॉलेज क्रॉस रोड वाखरी मार्गे जातील.
पंढरपूर शहरात प्रदक्षिणा मार्गात सर्व प्रकारच्या वाहनांस बंदी करण्यात येत आहे.