नरकासुररूपी प्रवृत्ती नको !

दीपावली विशेष !

दिवाळी हा मोठ्या उत्साहाचा, आनंदाचा आणि पवित्र सण आहे. भगवान श्रीकृष्णाने दुष्ट नरकासुराला ठार केल्यामुळे प्रजेला अत्यंत आनंद झाला. त्या दिवसाच्या आठवणीसाठी आनंदाचे प्रतीक म्हणून दिवाळीतील नरकचतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचाच जयजयकार सर्वत्र व्हायला पाहिजे. त्याचीच भक्ती या दिवाळीच्या सणानिमित्त होणे आवश्यक आहे. श्रीकृष्णामुळे जगाला भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान जगाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे कृतज्ञताभावाने आपण भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच त्याच्या कृपेचा लाभ आपल्याला होऊ शकतो. ‘सत्प्रवृत्तीला प्रोत्साहन आणि दुष्प्रवृत्तीचा नाश करणे, हे समाजात बिंबवणे’, हाच या सणाचा उद्देश आहे. सध्या दिवाळी या सणाला आलेले विकृत स्वरूप पालटून भक्तीचे, सुख-शांतीचे स्वरूप पुन्हा प्राप्त करून दिले, तरच दिवाळीचा खरा आनंद आपण उपभोगू शकतो.

गोव्यात अगदी ५० वर्षांपूर्वीपर्यंत दिवाळी सण अत्यंत भक्तीभावाने, आनंदाने साजरा करण्यात येत होता. नरकासुराची प्रतिकृती करून ती येथील परिसरात जाळण्यात येत होती. त्यात सर्व लहान मुले नरकासुराच्या प्रतिमेला जाळण्यामध्ये आनंद घेत होती. दिवाळीच्या दिवशी सगळीकडे रांगोळ्या काढून, पणत्या लावून उत्सव साजरा करण्यात येत होता. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देऊन, तिखट-गोड पोह्यांचा फराळ एकमेकांना दिला जाई. आता जो दिवाळी सण साजरा करण्यात येतो, त्यामध्ये पूर्वीसारखी श्रीकृष्णाप्रतीची भक्ती, उत्साह, आनंद जाणवत नाही. उलट नरकासुराचेच उदात्तीकरण होत आहे. आता नरकासुर स्पर्धांमध्ये होणार्‍या कर्णकर्कश आवाजाने वातावरण प्रदूषित होत आहे. स्पर्धेत मोठमोठ्या बक्षिसाच्या रकमा ठेवल्यामुळे युवा पिढीवर नको तो वाईट परिणाम होतांना दिसतो. काही ठिकाणी नरकासुरदहनाच्या नावाखाली खंडणीही उकळली जाते. युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. नरकासुर स्पर्धेमुळे श्रीकृष्ण भक्तीचा लवलेशही जाणवत नाही. आसुरी प्रवृत्ती वाढल्याने शांत समाज बिघडत आहे. हे गेल्या काही वर्षांत गोवेकर अनुभवत आहेत. नरकासुर स्पर्धांमुळे अपघात होऊन कितीतरी युवकांनी प्राण गमावलेला आहे. कर्णकर्कश ‘डीजे’च्या आवाजामुळे गोमंतकीय त्रस्त होत आहेत. मोठमोठे नरकासुर रस्त्यावर जाळल्याने पडलेल्या लोखंडाच्या खिळ्यांमुळे, सापळ्यामुळे अपघात होत आहेत. अशा विकृतीमुळे सनातन धर्माला काळीमा लागून धर्महानी होत आहे. ही स्थिती पालटून खरी दिवाळी साजरी होण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

– श्री. श्रीराम खेडेकर, गोवा.